शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्रचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 14:16 IST2019-06-03T14:14:15+5:302019-06-03T14:16:19+5:30
राज्यातील बारा हजारावर जागांवर पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीला पोर्टलच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवड्यापासून प्राधान्यक्रम भरण्यास विद्यार्थ्यांची गर्दी होत असताना, पोर्टल वारंवार बंद पडत आहे.

शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्रचा अडसर
सांगली : राज्यातील बारा हजारावर जागांवर पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीला पोर्टलच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवड्यापासून प्राधान्यक्रम भरण्यास विद्यार्थ्यांची गर्दी होत असताना, पोर्टल वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण करून शाळा सुरू होण्याच्या पहिल्यादिवशी तरुणांना शिक्षण सेवेत रूजू होण्याचा मुहूर्त हुकणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शिक्षण संस्थांमधील १२ हजारांवर जागा भरण्यात येणार आहेत. शिक्षक भरतीमध्ये सध्या पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. उमेदवारांच्या पात्रता व विषयांनुसार प्राधान्यक्रम यादी येत आहे. मात्र, ही यादी अंतिम करता येत नाही. त्यातच विज्ञान शाखेतील काही विषयांचा समावेशच नसल्याची बाब समोर आली आहे.
प्राधान्यक्रम भरताना अडचणी येत असतानाच, आता शुक्रवारपासून पूर्ण पोर्टलच बंद पडत आहे. प्राधान्यक्रम भरण्यास अगोदर २२ मेपासून ३१ मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, या सर्व अडचणीमुळे ४ जूनपर्यंत मुदत वाढविण्यात आली असली तरी या मुदतीतही प्राधान्यक्रम भरून होणार नाहीत, अशी स्थिती आहे. याला मुदतवाढ दिल्यास मुलाखतीसह इतर प्रक्रियेला वेळ लागणार आहे.
शासनाच्या नियोजनानुसार शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर शिक्षक भरती पूर्ण करून पहिल्यादिवशीच नवीन शिक्षकांना रूजू करून घेण्यात येणार होते. मात्र, पवित्रच्या तांत्रिक बिघाडामुळे १७ जूनला शिक्षक म्हणून रूजू होता येईल, हे तरुणांचे स्वप्न दिवास्वप्न ठरणार आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेबाबात आता नाराजीचा सुरही उमटत आहे.