मिरज शहरात मिरवणूक
By Admin | Published: December 24, 2015 11:39 PM2015-12-24T23:39:34+5:302015-12-24T23:46:07+5:30
‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात : विविध सामाजिक उपक्रम
मिरज : मिरज शहर व परिसरात पैगंबर जयंती तसेच ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी करण्यात आली. बाराईमाम दर्ग्यापासून शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. मीरासाहेब दर्गा आवारात या मिरवणुकीचा समारोप झाला.बाराईमाम दर्ग्यापासून मिरवणुकीत मोठ्या संख्येने तरूण व मुले घोषणा देत सहभागी झाली होती. लक्ष्मी मार्केट, बुधवार पेठ, गुरूवार पेठ येथून फिरून मिरवणुकीचा समारोप झाला. याप्रसंगी मीरासाहेब दर्ग्याच्या पटांगणात विशेष प्रार्थना झाली. मिरवणुकीत घोड्यावर बसलेली लहान बालके टिपू सुलतानच्या वेशभूषेत होती. पीआरपी, एमआयएम आणि फाईन ग्रुपतर्फे मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना सरबत वाटप करण्यात आले. ए. जी. नदाफ, महंमद सतारमेकर, मुस्तफा मुश्रीफ, रफिक मुजावर, असगर शरीकमसलत, समीर सय्यद, जैलाब शेख, अय्याज नायकवडी, जहिर मुजावर यांच्यासह कार्यकर्त्यांनी संयोजन केले.दर्गा आवारात मिरवणुकीच्या समारोपप्रसंगी नात शरीफ, सलाम व प्रार्थना झाली. दर्गा पेशईमाम, कादरी जनाब, हाफीज महंमदहनिफ मुल्ला यांनी प्रेषित पैगंबरांचे विचार सांगितले. अतिरिक्त अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, दर्गा सरपंच अब्दुल अजिज मुतवल्ली उपस्थित होते. ईद-ए-मिलादनिमित्त मिरज शहरात विविध ठिकाणी अन्नदान केले. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात राज्य राखीव दलासह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (वार्ताहर)
घोडे, बैलगाड्या मिरवणुकीचे आकर्षण
मिरवणुकीत घोड्यावर बसलेली लहान बालके टिपू सुलतानच्या वेशभूषेत होती. रिक्षा, बैलगाड्या व डफवादक मिरवणुकीत सहभागी झाले होते. पीआरपी, एमआयएम आणि फाईन ग्रुपतर्फे मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना सरबत वाटप करण्यात आले.