जिल्ह्यातील द्राक्ष, बेदाणा उत्पादन ५0 टक्के घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 12:44 PM2019-11-02T12:44:13+5:302019-11-02T12:45:30+5:30
जिल्ह्यातील द्राक्षबागायतदारांना हजारो कोटींचा फटका बसला आहे. द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने यंदा द्राक्षे आणि बेदाण्याचे उत्पादनही निम्म्यावर येण्याची शक्यता आहे.
तासगाव : परतीच्या पावसाने झोडपून काढल्यामुळे सांगली जिल्ह्यात सुमारे ६० हजार एकर द्राक्षबागांना फटका बसला आहे. खरीप छाटणीपासून पीक छाटणीपर्यंत एकरी सुमारे दीड ते दोन लाख रुपये खर्च करूनदेखील पावसामुळे द्राक्षबागा सोडून देण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्षबागायतदारांना हजारो कोटींचा फटका बसला आहे. द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने यंदा द्राक्षे आणि बेदाण्याचे उत्पादनही निम्म्यावर येण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवडाभरात पावसाने कधी नव्हे एवढे जिल्ह्याला झोडपून काढले. दुष्काळी पट्ट्यातही मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सप्टेंबर महिन्यात पीक छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसला. सुरुवातीला द्राक्षबागा जगवण्यासाठी हजारो रुपयांची औषध फवारणी करूनदेखील पावसाने पिच्छा सोडला नाही. त्यामुळे शेतकरीच हतबल झाला.
जिल्ह्यातील सुमारे ६० एकर द्राक्षबागांची पीक छाटणी झाली आहे. त्यातील बहुतांश द्राक्षबागांना मोठा फटका बसला. दावण्यासारख्या रोगांनी द्राक्षघड खराब झाले. सततच्या पावसाने मणीगळ, घडकुजीसारख्या संकटांना सामोरे जावे लागले. त्यामुळे अनेक द्राक्षबागायतदारांनी बागा सोडून दिल्या आहेत.
औषध फवारणी करून मोठ्या जिद्दीने द्राक्षे टिकवून ठेवण्यासाठी अद्यापही काही द्राक्षबागायतदारांची केविलवाणी धडपड सुरु आहे. मात्र पावसाने झालेल्या नुकसानीचा फटका उत्पन्नाला बसणार असल्याचे दिसून येत आहे.
बहुतांश द्राक्षबागांचे उत्पन्न निम्म्यावर येणार आहे. त्यामुळे द्राक्षबागांना हजारो कोटींचा फटका बसणार असल्याचे चित्र आहे. नुकसानीमुळे यंदा द्राक्षे आणि बेदाण्याच्या उत्पादनातही घट होणार आहे.