साखर उत्पादन १ कोटी क्विंटलकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:22 PM2018-04-11T23:22:02+5:302018-04-11T23:22:02+5:30
अशोक डोंबाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी दि. १० एप्रिलअखेर ७९ लाख टन उसाचे गाळप करुन ९६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून, मागील दहा वर्षातील हे विक्रमी गाळप आहे. दहा साखर कारखान्यांनी गळीत हंगाम बंद केले असून पाच कारखान्यांचे गळीत हंगाम येत्या आठ दिवसात बंद होणार आहेत. यावर्षी प्रथमच जिल्ह्यातील कारखाने एक कोटी क्विंटल साखरेचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात एकूण १८ साखर कारखाने असले तरी, यशवंत, डफळे आणि तासगाव या कारखान्यांचे गळीत हंगाम दोन वर्षापासून बंदच आहेत. उर्वरित १५ साखर कारखान्यांनी नोव्हेंबर २०१७ च्या पहिल्या आठवड्यात गळीत हंगामाला सुरुवात केली. चार महिने अखंडित गळीत हंगाम घेऊन ७९ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत ९६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. वसंतदादा (सांगली), राजारामबापू पाटील (साखराळे, ता. वाळवा), विश्वास (चिखली, ता. शिराळा), महांकाली (कवठेमहांकाळ), राजारामबापू (वाटेगाव, ता. वाळवा), राजारामबापू (सर्वोदय युनिट, कारंदवाडी, ता. वाळवा), मोहनराव शिंदे (आरग, ता. मिरज), निनाईदेवी (दालमिया, कोकरुड, ता. शिराळा), उदगिरी शुगर अँड पॉवर (बामणी-पारे, ता. खानापूर), सद्गुरु श्री श्री शुगर (राजेवाडी, ता. आटपाडी) या दहा साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. सध्या हुतात्मा (वाळवा), माणगंगा (आटपाडी), क्रांती (कुंडल, ता. पलूस), सोनहिरा (वांगी, ता. कडेगाव) आणि केन अॅग्रो (डोंगराई, ता. कडेगाव) या पाच कारखान्यांचे गळीत हंगाम आठवडाभर चालू राहणार आहेत. या कारखान्यांमध्ये जवळपास तीन ते चार लाख टन उसाचे गाळप होऊन पाच ते सहा लाख क्विंटल साखरेचे उत्पादन होणार आहे. म्हणजेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा एक कोटी क्विंटल साखरेचा आकडा पार होण्याची शक्यता आहे. यावर्षी दहा वर्षातील विक्रमी गाळप होणार असल्याचेही कारखानदारांचे मत आहे.
राजारामबापू साखराळे युनिटने जिल्ह्यातील सर्वाधिक गाळप करुन जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सर्वात कमी गाळप माणगंगा साखर कारखान्याचे असून तेथे आतापर्यंत केवळ ८३ हजार २२४ टन उसाचे गाळप करुन ६९ हजार ९२५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
कारखानदारांनी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये : महावीर पाटील
जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी मार्चचा पूर्ण महिना आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या उसाची बिले शेतकºयांना दिलेली नाहीत. तसेच सर्वच साखर कारखानदारांनी साखरेचे दर पडल्याचे कारण पुढे करून एफआरपीनुसार बिलेच दिली नाहीत. साखर कारखानदारांनी सरकारकडे भांडावे आणि अनुदान घ्यावे, काहीही करावे, पण शेतकºयांना शंभर टक्के बिले द्यावीत, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोल छेडावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष महावीर पाटील यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील गळीत हंगामाची सद्यस्थिती...
कारखाना ऊस गाळप (मे. टन) साखर उत्पादन (क्विं.) उतारा टक्के
वसंतदादा ७१३६७० ८५१६७० ११.९३
राजारामबापू (साखराळे) १००८१८० १२८७००० १२.७७
विश्वासराव नाईक ५३३९५५ ६४४००० १२.०६
हुतात्मा ६८३४४० ८७७५०० १२.८४
माणगंगा ८३२२४.७ ६९९२५ ८.४०
महांकाली १८२४८० १९४७७० १०.६७
राजारामबापू (वाटेगाव) ५३२५३०९ ६७०७०० १२.५९
सोनहिरा ९१५२४५ ११३९२५० १२.४५
क्रांती ९०४३१० १११३९५० १२.३२
सर्वोदय ४१९१३९.९ ५२८००० १२.६०
मोहनराव शिंदे ३७०२८५ ४२२६१० ११.४१
निनाईदेवी (दालमिया) १४७४९१ १८२३५० १२.३६
केन अॅग्रो ३७४१४० ४५६१६० १२.१९
उदगिरी शुगर ४६१०२० ५४३४०० ११.७९
सद्गुरु श्री श्री शुगर ५०३२३७.५ ५८३४०० ११.५६
एकूण ७८३२३४९ ९६१२०८५ १२.२१