तासिका तत्वाचे प्राध्यापक विकताहेत चुरमुरे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:32 AM2021-09-08T04:32:22+5:302021-09-08T04:32:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लॉकडाऊन काळात तासिका तत्वावरील प्राध्यापकांना उदरनिर्वाहासाठी मिळेल ती कामे करावी लागत आहेत. एका प्राध्यापकाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लॉकडाऊन काळात तासिका तत्वावरील प्राध्यापकांना उदरनिर्वाहासाठी मिळेल ती कामे करावी लागत आहेत. एका प्राध्यापकाने चुरमुरे-शेंगदाण्याचा गाडा टाकला आहे, तर एकाने चहाची टपरी सुरु केली आहे. प्राध्यापकांची भरती प्रक्रिया रेंगाळल्याने जगण्यासाठी धडपड करावी लागत आहे. महाविद्यालयांत ऑनलाईन वर्ग सुरु असले तरी तेथे तासिका तत्वाच्या प्राध्यापकांना संधी मिळालेली नाही, त्यामुळे दीड वर्षांत गिन्नीचीदेखील कमाई झालेली नाही. शेतात रोजगार करुन चार पैसे मिळविण्याची धडपड सुरु आहे.
बॉक्स
- नेट किंवा सेट उत्तीर्ण झालेल्या प्राध्यापकांना चांगल्या पगारासह कायम नोकरीची अपेक्षा होती, पण निराशाच झाली आहे.
- २००९ नंतर २०१७ मध्ये पवित्र पोर्टलमधून भरती झाली, पण त्यामध्ये मोजक्याच उमेदवारांना संधी मिळाली.
बॉक्स
उमेदीचा काळ नोकरीची वाट पाहण्यातच
- शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यात प्राध्यापक भरतीची घोषणा नुकतीच केली आहे, पण अंमलबजावणीच्या दृष्टीने पुढे पाऊल पडलेले नाही.
- या स्थितीत अनेक तरुणांची वयोमर्यादा संपत आहे. त्यांच्या उमेदीचा काळ संपत आहे. हे किती दिवस चालणार? हा त्यांचा प्रश्न आहे.
कोट
प्राध्यापकी नव्हे, ही तर वेठबिगारी
प्राध्यापकीचे शिक्षण घेतल्याने कुटुंबियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, पण कायम नोकरी मिळत नसल्याने निराशा पदरी पडत आहे. सीएचबी तत्वावरील नोकरीत मिळणाऱ्या मानधनात स्वत:चा खर्चही भागवता येत नाही.
- प्रा. चंद्रकांत कोरे, कवठेमहांकाळ
- शासनाने प्राध्यापक भरतीत न्याय्य प्रक्रिया राबविली नाही. अनेक तरुण क्षमता असतानाही नोकरीपासून वंचित राहिले. वशिला आणि पैसे असणारेच जागा बळकावून बसले. यामुळे समाजाला चांगले शिक्षक कसे मिळणार? हा प्रश्न आहे.
- प्रा. राज घोटीकर, खरसुंडी
बीएड किंवा एमएड करताना चांगला प्राध्यापक होण्याचे स्वप्न बाळगले होते. आता परिस्थिती पाहून नव्या तरुणांना या पेशात येऊ नको असे सांगावे लागते. भवितव्याची कोणतीही हमी नाही. उच्चशिक्षित असल्याने लहानमोठी कामेही करता येत नाहीत.
- प्रा. परशुराम माने, सांगली