प्राध्यापकांनो, पगाराला साजेसे काम करा!
By Admin | Published: October 27, 2015 11:20 PM2015-10-27T23:20:35+5:302015-10-28T00:02:28+5:30
अरुण निगवेकर : पतंगराव कदम महाविद्यालयाचा तिसावा वर्धापनदिन उत्साहात
सांगली : केवळ दोन ते तीन तास महाविद्यालयात येऊन अभ्यासक्रम पूर्ण करायचा, या मानसिकतेतून प्राध्यापकांनी बाहेर येण्याची गरज आहे. शासनाकडून पगारही चांगला दिला जात असून प्राध्यापकांनी त्याला साजेसे काम करावे, असा सल्ला विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांनी मंगळवारी दिला. पाणी, संरक्षणाएवढेच महत्त्व शैक्षणिक धोरणालाही दिले पाहिजे. मात्र केंद्र आणि राज्य शासन शैक्षणिक धोरणाबाबत फारसे गंभीर दिसत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.सांगलीवाडी येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या तिसाव्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निगवेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठाचे कुलपती व माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम होते.
निगवेकर म्हणाले की, तरुणांच्या ज्ञानाची भूक भागविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी प्राध्यापकांची आहे. पुस्तके वाचून त्याचे सादरीकरण करणे म्हणजे शिकवणे नव्हे, हे प्राध्यापकांनी लक्षात घेतले पाहिजे. सध्या शिक्षणाचे व्यावसायीकरण झाल्याचे सांगितले जाते, पण या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले पाहिजे की नाही? कला, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षणही दिले पाहिजे. यासाठीच प्राध्यापकांना शासनाने चांगला पगार दिला आहे. जेवढा पगार मिळतो, तेवढे परिपूर्ण ज्ञान विद्यार्थ्यांना द्यायला नको का? महाविद्यालय आणि प्राध्यापक तसे शिक्षण देत नसतील, तर त्यांना जाब विचारण्याचे धाडस विद्यार्थ्यांनी दाखविले पाहिजे.
पतंगराव कदम म्हणाले की, भारती विद्यापीठ केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही. आम्ही चार संशोधन विभाग सुरू केले आहेत. तेथे प्राध्यापक व विद्यार्थ्यांना संशोधन करण्याची मोठी संधी आहे. भविष्यातही मोठी झेप घ्यायची आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले की, शांतिनिकेतन येथील महाविद्यालयाच्या आंदोलनामुळे शिवाजी विद्यापीठास वेगळी दिशा दिली आहे. तेच महाविद्यालय सध्या पतंगराव कदम यांच्या नावाने सुरू आहे. चांगली प्रगती केली आहे. परंतु, या महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना नोकरीच्यादृष्टीने शिक्षण दिले पाहिजे.
भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले की, केंद्र शासन जानेवारी २०१६ मध्ये नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करणार आहे. प्रत्येक महाविद्यालयाबरोबरच आता प्राध्यापकांचे वार्षिक मूल्यांकन केले जाणार आहे. यामध्ये टिकण्यासाठी प्राध्यापकांनी खूप बदल करण्याची गरज आहे. यावेळी एच. एम. कदम, प्रा. डॉ. वसंतराव जुगळे, प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, प्रा. वैजनाथ महाजन, प्रा. डॉ. संजय ठिगळे, प्रा. डॉ. संतोष माने उपस्थित होते. प्रा. डॉ. श्रीकृष्ण मोहिते, प्रा. डॉ. बी. डी. पाटील, डॉ. प्रा. एम. एच. पाटील. वासंती बंडगर, डॉ. प्रा. जया कुरेकर, प्रा. प्रभा पाटील यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. बी. डी. पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
शिवाजीराव भरताप्रमाणे!
मी भारती विद्यापीठाची स्थापना केली. त्यानंतरचा सर्व कारभार प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांच्याकडे सोपविला व मी राजकारणात सक्रिय झालो. संस्थेकडे पाहण्यास मला फारसा वेळ मिळाला नाही. ज्याप्रमाणे राम वनवासाला गेल्यानंतर भरताने त्याच्या पादुका प्रामाणिकपणे सांभाळल्या, त्या भरताप्रमाणेच शिवाजीरावांनी भारती विद्यापीठाचा कारभार प्रामाणिकपणे सांभाळला. त्यामुळेच आज आंतरराष्ट्रीय पातळीवर भारती विद्यापीठाच्या संस्था पोहोचल्या आहेत, असे भावनिक उद्गार पतंगराव कदम यांनी काढले.