महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाचे काम 'प्रागतिक पक्ष आघाडी' करेल - बाबासो देवकर
By अशोक डोंबाळे | Published: August 21, 2023 02:33 PM2023-08-21T14:33:09+5:302023-08-21T14:33:54+5:30
आघाडीची सांगलीत झाली बैठक, जिल्ह्याच्या समन्वयकपदी दिगंबर कांबळे
सांगली : राज्यामध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी शेतकरी, शेतमजूर, कामगार कर्मचारी आणि महिला, विद्यार्थी, युवकांच्या प्रश्नावर राज्यभर आवाज उठविण्यात येणार आहे. या सर्व घटकांना बरोबर घेऊन राज्यातील सत्तेच्या बाजाराला फाटा देऊन परिवर्तन घडविण्याची लढाई सुरु करायची आहे. या लढाईमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रागतिक पक्ष आघाडीचे कोल्हापूर जिल्ह्याचे समन्वयक बाबासो देवकर यांनी केले. तसेच राज्यात १३ विभागीय मेळावेही घेण्यात येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष, समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (सेक्यूलर), बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा (माले) लिबरेशन, आर. पी. आय. (सेक्यूलर), श्रमिक मुक्ती दल अशा तेरा पक्षांची प्रागतिक पक्ष महाराष्ट्र अशी आघाडी केली आहे. या आघाडीची सांगलीत बैठक झाली. यावेळी बाबासो देवकर बोलत होते. या बैठकीत आघाडीच्या सांगली जिल्हा समन्वयकपदी दिगंबर कांबळे यांची निवड केली आहे.
यावेळी लाल निशाण पक्षाचे कॉ. अतुल दिघे, शेकापचे ॲड्. अजित सूर्यवंशी, सुभाष पाटील, प्रा. बाबुराव लगारे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नंदकुमार हत्तीकर, संदीप कांबळे, शरद पाटील, पांडुरंग जाधव, सूर्यकांत पाटील, बाबुराव जाधव, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, जनता दलाचे जनार्दन गोंधळी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. नितीन पाटील, योगेश नाडकर्णी, लाल निशाण पक्षाचे कॉ. गोपाळ पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीत कोल्हापूर, सांगली, सातारा व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा दि. ४ सप्टेंबर रोजी महासैनिक दरबार हाॅल, कोल्हापूर येथे होणार आहे.