प्राध्यापकावर हल्ल्याचा निषेध

By admin | Published: December 6, 2015 12:31 AM2015-12-06T00:31:28+5:302015-12-06T00:31:28+5:30

इस्लामपुरात मोर्चा : एन. डी. पाटील यांचा आंदोलनाचा इशारा

Prohibition of attack on Professor | प्राध्यापकावर हल्ल्याचा निषेध

प्राध्यापकावर हल्ल्याचा निषेध

Next

इस्लामपूर : बहुजन समाजासाठी ज्या कर्मवीरअण्णांनी शिक्षणाची कवाडे सुरू केली, तेथेच घडलेला भ्याड हल्ल्याचा प्रकार दुर्देवी आहे. विचार आणि विवेकाविरोधातील कृती संघटितपणे संपवायला हवी. या घटनेतील पोलिसांची भूमिका संशयास्पद असून, या सर्व प्रकरणाची तड लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दिला.
येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील प्रा. डॉ. नितीन शिंदे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शनिवारी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी यासह सामाजिक संघटनांनी मोर्चा काढला. तहसील कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. तेथे तहसीलदार रूपाली सरनोबत यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत या घटनेचा तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रा. डॉ. पाटील म्हणाले, प्रा. डॉ. शिंदे यांच्यावर झालेला हल्ला हा एका शिक्षकावरील नसून, तो विवेक आणि विचाराच्या वाटेवरील सर्वच कार्यकर्त्यांवरील आहे. शिक्षण क्षेत्रावरील हा भ्याड हल्ला समाजासाठी घातक आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्ती वेळीच रोखायला हव्यात. या भ्याड हल्ल्याचा समाजाने निषेध करायला हवा.
ते म्हणाले, प्रा. डॉ. शिंदे यांचे शिक्षण व चळवळीतील काम मोठे आहे. अशा व्यक्तीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलेली भूमिका संशयास्पद आहे. त्यांनी वर्दीशी इमान राखून कायद्याचे रक्षण करावे. या सर्व प्रकरणाची तड आम्ही लावणारच.
सामाजिक कार्यकर्त्या शैला दाभोलकर म्हणाल्या, अशा हल्ल्याचा नीती व निर्धाराने विरोध करायला हवा. संयम आणि लोकशाही मार्गाने अशा घटनांविरुद्ध संघटितपणे तोंड देऊ. यावेळी माजी प्राचार्य विश्वास सायनाकर, प्राचार्य डॉ. जे. के. पाटील, कॉ. धनाजी गुरव, संजय बनसोडे, प्राचार्य एस. बी. माने, प्राचार्य बी. एस. काळे, भाई काका पाटील, सुटाचे आर. एस. पाटील, प्रा. सौ. एम. एस. मोरे, अ‍ॅड़ के. डी. शिंदे, महेश बाबर, अर्पिता बच्चे, माधव बागवे (लातूर) यांची भाषणे झाली. प्रा. डॉ. नितीन शिंदे यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Prohibition of attack on Professor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.