‘नागबंदी’च्या निषेधार्थ शिराळ्यात कडकडीत बंद
By admin | Published: July 16, 2014 11:28 PM2014-07-16T23:28:41+5:302014-07-16T23:38:41+5:30
तहसीलदार विजया यादव यांना निवेदन
शिराळा (जि. सांगली) : नागपंचमीसाठी जिवंत नाग पकडू नयेत, जिवंत नागाची पूजा करू नये, असा आदेश उच्च न्यायालयाने दिल्याच्या निषेधार्थ आज, बुधवारी शिराळा शहर बंद ठेवण्यात आले. या निर्णयास स्थगिती मिळेपर्यंत बेमुदत बंद व लढा देण्याचा निर्णय सर्व नागराज मंडळ, नागरिकांनी घेतला आहे. प्रशासनाने या निर्णयाबाबत येथील जनतेच्या भावना कळवाव्यात, असे निवेदन तहसीलदार विजया यादव यांना देण्यात आले.
नागपंचमीसाठी जिवंत नाग पकडण्यास आणि पूजा करण्यास परवानगी मिळावी, अशी याचिका शिराळा ग्रामपंचायतीने न्यायालयात दाखल केली होती. त्यावर मंगळवार, दि. १५ जुलैरोजी न्यायमूर्ती एस. ए. चांदोलकर व अभय ओक यांच्या खंडपीठाने ती याचिका फेटाळून लावत जिवंत नाग पकडणे, त्याची पूजा करणे, मिरवणूक काढणे
यावर बंदीचा निर्णय दिला. या निर्णयानंतर शिराळा शहरातील नागरिक, भाविक, नाग मंडळांचे कार्यकर्ते यांच्यात संतापाची लाट पसरली आहे. आज शिराळा शहर बंद ठेवण्यात येऊन मोर्चाद्वारे तहसीलदार विजया यादव यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी त्यांनी या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्याचे आश्वासन दिले.या मोर्चाचे नंतर बैठकीत रूपांतर झाले. ग्रामदैवत अंबामाता मंदिरात ही बैठक झाली. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी शांततेत बंद पाळावा, न्यायालयाचा मान राखावा, असे आवाहन केले.