जुन्या नोटा बुडीत खाती धरण्यास स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:12 AM2018-09-27T00:12:58+5:302018-09-27T00:13:02+5:30
सांगली : नोटाबंदीनंतर कालबाह्य ठरलेल्या शिल्लक नोटा जिल्हा बँकांनी बुडीत खाती जमा करण्याच्या ‘नाबार्ड’ने दिलेल्या आदेशास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. त्यामुळे राज्यातील आठ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे.
पाचशे व हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर झाला. मात्र, त्यापूर्वीच जिल्हा बँकेत जमा असलेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटाही या निर्णयामुळे अडकल्या. नोटाबंदीनंतरच्या व पूर्वीच्या अशा सर्वच रकमा जवळपास वर्षभर जिल्हा बँकांमध्ये पडून राहिल्या. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने केवळ ८ नोव्हेंबरनंतर जमा झालेल्याच नोटा स्वीकारण्याचे धोरण जाहीर केले. जिल्हा बँकांनी संबंधित रकमा जमाही केल्या. मात्र, राज्यातील आठ जिल्हा बँकांकडे ८ नोव्हेंबरपूर्वीच्या ११२ कोटींच्या नोटा तशाच शिल्लक आहेत. त्यामध्ये सांगली जिल्हा बँकेसह पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, वर्धा, नागपूर आणि अमरावती या बँकांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करूनही ही रक्कम स्वीकारली जात नसल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
याचिकेवरील सुनावणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती अर्जन कुमार शिक्री व न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर झाली. बँकांची चूक नसताना त्यांनी तोटा का सहन करायचा?, असा प्रश्न उपस्थित करून या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी विनंती जिल्हा बँकांच्या वकिलांनी केली. न्यायालयाने ती मान्य करून पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होईल, असे स्पष्ट केले.
‘नाबार्ड’ने ३० जानेवारी २०१८ रोजी या आठही जिल्हा बॅँकांना एक पत्र पाठवून, या शिल्लक रकमा बुडीत खाती जमा करण्याचे आदेश दिले होते.
‘नाबार्ड’च्या या आदेशाला स्थगिती मिळाली असल्याने शिल्लक असलेल्या जुन्या नोटा अंदाजपत्रकात समाविष्ट केल्या जातील. त्यामुळे तितक्या रकमेचा तोटा आता दिसणार नाही.
या जिल्हा बँकांकडे आहेत जुन्या नोटा...
कालबाह्य ठरलेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून सांगली जिल्हा बँकेकडे १४.७२ कोटी, पुणे बँकेकडे २२.२५ कोटी, वर्धा बँकेकडे ७९ लाख, नागपूर बँकेकडे ५.0३ कोटी, अहमदनगर बँकेकडे ११.६0 कोटी, अमरावती बँकेकडे ११.0५ कोटी, कोल्हापूर बँकेकडे २५.२८ कोटी आणि नाशिक जिल्हा बँकेकडे २१.३२ कोटी, अशा रकमा शिल्लक आहेत. शिल्लक असलेली सर्व रक्कम अनुत्पादित असल्याने त्याच्या व्याजाच्या रूपानेही फटका बसणार आहे.