प्रभाग सभापती निवडी लांबणीवर
By admin | Published: March 22, 2016 11:24 PM2016-03-22T23:24:17+5:302016-03-22T23:24:17+5:30
रचनेत बदलासाठी गोपनीय बैठक : महासभेत ठरावाच्या हालचाली
सांगली : महापालिकेच्या चारपैकी दोन प्रभाग समितीत सत्ताधारी काँग्रेसचे वर्चस्व कायम रहावे, यासाठी रचनेतच फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मंगळवारी महापौर हारूण शिकलगार व गटनेते किशोर जामदार यांनी रात्री उशिरापर्यंत रचनेबाबत खलबते केली. येत्या महासभेत नवीन प्रभाग रचना अस्तित्वात आणण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रभाग सभापतीच्या निवडी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेत काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. पण चारही प्रभाग समित्यांवर वर्चस्व राखण्यासाठी काँग्रेसला प्रत्येक निवडीवेळी कसरत करावी लागते. प्रभाग समिती एक व चारमध्ये काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. प्रभाग दोन व तीनमध्ये सत्ताधारीपेक्षा विरोधकांचे संख्याबळ अधिक असल्याने या दोन समितीत काँग्रेसला तडजोडीचे राजकारण करावे लागते.
प्रत्येक सभापती निवडीत दोन समित्यांमध्ये काँग्रेसची अवस्था बिकट होते. त्यावर उपाय म्हणून आता प्रभाग समितीच्या रचनेतच बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसा ठरावही सत्ताधाऱ्यांनी डिसेंबर महिन्याच्या महासभेत करून घेतला होता. विद्यमान चारही सभापतींची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे. त्यापार्श्वभूमीवर महापौर हारूण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, नगरसेवक राजेश नाईक यांची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. येत्या महासभेत नवीन प्रभाग रचनेचा ठराव करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
दोन व तीन प्रभागात बदल
प्रभाग समिती दोन व तीनमधील सदस्य संख्येत बदल करण्यात येणार आहे. या दोन्ही समित्यांवर विरोधकांचे वर्चस्व आहे. यापैकी सांगलीतील प्रभाग समिती दोन सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात राहील, अशी व्यूहरचना आखली जात आहे. त्यासाठी प्रभाग तीनमधील दोन सदस्यांना प्रभाग दोनमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. त्यातून प्रभाग तीनमध्ये काँग्रेसचे संख्याबळ कमी होईल. मिरजेतून काही सदस्यांना प्रभाग तीनमध्ये समाविष्ट करता येते का? याची चाचपणी सुरू आहे. तसे न झाल्यास प्रभाग तीन सोडून इतर तीन समित्या तरी आपल्या ताब्यात राहतील, अशी रचना होणार आहे.