मिरजेत देशातील नामवंत गायक-वादकांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 05:35 PM2018-04-12T17:35:00+5:302018-04-12T17:35:00+5:30
मिरजेतील मीरासाहेब दर्गा उरूसात महान गायक व किराना घराण्याचे अध्वर्यु संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीत सभेची परंपरा गेली ८३ वर्षे आजही सुरू आहे. किराना घराण्यातील दिग्गज गायक-वादक दर्ग्यातील चिंचेच्या झाडाखाली गायन-वादनाने अब्दुल करीम खाँ यांना श्रध्दांजली अर्पण करतात.
मिरज : मिरजेतील मीरासाहेब दर्गा उरूसात महान गायक व किराना घराण्याचे अध्वर्यु संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीत सभेची परंपरा गेली ८३ वर्षे आजही सुरू आहे. किराना घराण्यातील दिग्गज गायक-वादक दर्ग्यातील चिंचेच्या झाडाखाली गायन-वादनाने अब्दुल करीम खाँ यांना श्रध्दांजली अर्पण करतात. देशातील अन्य कोणत्याही नामवंत गायकाच्या स्मृतीनिमित्त एवढी वर्षे संगीत सभेची परंपरा सुरू नाही.
उत्तर प्रदेशातील कैराना येथील अब्दुल करीम खाँ यांची मिरज ही कर्मभूमी होती. मिरजेत १९३० मध्ये त्यांनी बंगला बांधून तेथे वास्तव्य केले. खाँसाहेबांनी त्यांच्या गवई बंगल्यात नामवंत शिष्यांना गायकीचे धडे दिले. मिरजेत प्लेगचा आजार झाल्याने मीरासाहेब दर्ग्यात जाऊन गानसेवा केल्याने खाँसाहेब प्लेगच्या आजारातून पूर्ण बरे झाले. तेव्हापासून अब्दुल करीम खाँ यांची मिरजेतील मीरासाहेब दर्ग्यावर अपार श्रध्दा होती. खाँसाहेब देशात कोठेही गेले तरी उरूसाच्या दुसऱ्या दिवशी मिरजेत येऊन दर्ग्यातील चिंचेच्या झाडाखाली गानसेवा करीत असत. सुमारे ४० वर्षे त्यांनी हे व्रत पाळले. खाँसाहेब १९३८ मध्ये महाराष्ट्राबाहेर असताना त्यांचे निधन झाले. शिष्यांनी खाँसाहेबांचे पार्थिव मिरजेत आणून दर्गा आवारात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. दर्ग्यात गानसेवा करणाऱ्या खाँसाहेबांच्या मृत्यूनंतर १९३८ पासून त्यांच्या शिष्यांनी दर्गा उरूसात अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभा सुरू केली. १९३८ मध्ये दर्गा उरूसातील पहिल्या स्मृती संगीत सभेचे आॅल इंडिया रेडिओवरून प्रक्षेपण करण्यात आले होते. गेली ८३ वर्षे खाँसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीत सभा सुरू आहे. देशातील अन्य कोणत्याही नामवंत गायकाची पुण्यतिथी एवढी वर्षे साजरी होत नाही. १९३७ मध्ये खाँसाहेबांच्या निधनानंतर सवाई गंधर्व, हिराबाई बडोदेकर, संगीत दिग्दर्शक राम कदम, बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी, सरस्वतीबाई राणे, पंडित भीमसेन जोशी, पंडित गंगुबाई हनगल, पंडित फिरोज सुतार, प्रभा अत्रे, शोभा गुई, कैवल्यकुमार या शिष्यांनी दर्गा उरूसात गायन-वादनाची परंपरा पुढे सुरू ठेवली. किराना घराण्यातील दिग्गज गायकांचे खाँसाहेबांसोबत दर्ग्याशीही भावनिक नाते निर्माण झाले आहे. दर्गा संगीत सभेत गायक सुरेश वाडकर, पंडित मल्लिकार्जुन मन्सुर, नियाजअहमद-फैयाजअहमद, हिराबाई बडोदेकर, रोशनआरा बेगम, पंडित सुरेश माने, तबलावादक अहमदजान थिरकवा, पंडित कैवल्यकुमार गुरव, पंडित व्यंकटेशकुमार यांच्यासह दिग्गज गायक-वादकांनी दर्गा संगीत सभेत हजेरी लावली आहे. कोणतेही मानधन न घेता गायक-वादक दर्गा संगीत सभेत संधी मिळावी यासाठी धडपड करतात. मिरजेतील गवई बंगल्यात खाँसाहेबांच्या वस्तूंचे संग्रहालय करून ही इमारत राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी, यासाठी किराना घराण्यातील नामवंत कलाकारांकडून, गवई बंगला स्मृती मंडळाची स्थापना करून गेली २५ वर्षे शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. खाँसाहेबांची कन्या हिराबाई यांनी मिरजेत अब्दुल करीम खाँ स्मृती भवनाची उभारणी केली असून स्मृती भवनात सतार व तबलावादनाचे प्रशिक्षण देण्यात येते.
यंदा शुक्रवारी सुरुवात
दर्गा उरूसानिमित्त ८४ व्या संगीतरत्न अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेचा प्रारंभ शुक्रवारी सकाळी दर्ग्यातील चिंचेच्या झाडाखाली गायन-वादनाने होणार आहे. दर्गा संगीत सभेत केवळ ख्याल व अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत सादर होत असल्याने शास्त्रीय संगीत ऐकण्याची सवय झालेले रसिक श्रोते गर्दी करतात. दर्गा संगीत सभेने शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसाराला हातभार लावला आहे. दर्गा संगीत सभेमुळे मिरजेशी किराना घराण्याचे नाते कायम राहिले आहे.