Sangli: ऊसतोडीसाठी मजूर पुरविण्याचे आश्वासन, समडोळीतील शेतकऱ्याची अडीच लाखांची फसवणूक
By शीतल पाटील | Published: December 4, 2023 06:06 PM2023-12-04T18:06:23+5:302023-12-04T18:08:05+5:30
सांगली : उस तोडीकरिता मजूर पुरविण्याचे आश्वासन देवून मिरज तालुक्यातील समडोळी येथील शेतकऱ्याची तब्बल २ लाख ५१ हजाराची फसवणूक ...
सांगली : उस तोडीकरिता मजूर पुरविण्याचे आश्वासन देवून मिरज तालुक्यातील समडोळी येथील शेतकऱ्याची तब्बल २ लाख ५१ हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत तुकाराम आण्णा मस्कर (रा. जनसेवा चौक, समडोळी ) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार दि. २५ मार्च २०१९ पासून रविवार दि. ३ डिसेंबर अखेर घडला.
पोलिसांनी संशयित अजय शिवाजी राठोड (वय ४२, रा. जवळा, ता. बीड ) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती अशी, फिर्यादी तुकाराम मस्कर यांच्या शेतातील ऊस तोडीसाठी मजूरांची गरज होती. संशयिताने फिर्यादी मस्कर यांच्याशी संपर्क साधून त्यांना चौदा मजूर पुरविण्याचे आश्वासन दिले. त्याकरिता वेळोवेळी मस्कर यांच्याकडून २ लाख ५१ लाख रुपयांची रक्कम घेतली.
मात्र मजूर पुरविले नाहीत. यासंदर्भात मस्कर यांनी वेळोवेळी संशयित अजय राठोड याच्याकडे पाठपुरावा केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मस्कर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली.