प्लास्टिक बंदीमुळे प्रचार साहित्य महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 11:02 PM2018-07-04T23:02:06+5:302018-07-04T23:02:29+5:30
सदानंद औंधे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : महापालिका निवडणुकीसाठी हायटेक प्रचारसाधने उपलब्ध झाली आहेत. मात्र प्लास्टिक बंदीमुळे प्रचार साहित्य महागले असून, कापडी झेंडे, टोप्या व अन्य प्रचार साहित्य बाजारात आले आहे. मतदारांची नावे शोधण्यासाठी व मतदान स्लिप मोबाईल मेसेजद्वारे पाठविण्याची सोय असलेल्या मोबाईल अॅपचा उमेदवारांकडून वापर करण्यात येत आहे.
प्रचार पत्रके, झेंडे, टोप्या, मफलर, बिल्ले, महिलांसाठी बिल्ल्यांचा हार, या पारंपरिक प्रचार साहित्यासोबत डमी मतदान यंत्र स्टेज व्हॅन, हायड्रोलिक एलईडी डिस्प्ले व्हॅन, एलईडी सायकल डेमो, उमेदवाराचा माहितीपट, सोशल मीडियावर प्रचाराची व्हिडीओ क्लीप, एसएमएसद्वारे व्हॉईस कॉल, मराठी कलाकारांच्या आवाजात उमेदवाराच्या प्रचाराची ध्वनिफीत, पथनाट्य पॅकेज उपलब्ध आहे. प्लास्टिक बंदीमुळे झेंडे, टोप्या, मोटारसायकलवरील झेंडे या प्रचार साहित्यावर संक्रांत आली आहे.
पसंती : अॅपला
महापालिका निवडणुकीसाठी हायटेक प्रचार साधनांचा उमेदवारांकडून वापर सुरू आहे. प्रभागातील मतदारांची नावे, महिला, पुरूष, जात, वय, पत्ता अशा वर्गीकरणाची सोय असलेला मोबाईल अॅप उपलब्ध झाला आहे. १५ ते ३० हजारापर्यंत किंमत असलेल्या या अॅपद्वारे मतदारांना मतदान स्लिप मोबाईल मेसेजद्वारे पाठविण्याची सोय आहे. या अॅपमुळे मतदान केंद्रावर मतदार याद्या घेऊन बसण्याची आवश्यकता राहिलेली नाही. अॅपमुळे मतदान सुरू असताना मतदान न केलेल्या मतदारांची नावे उमेदवार व समर्थकांना समजणार आहेत. या मोबाईल अॅपचा उमेदवारांकडून वापर करण्यात येत आहे. गॅस वितरकांकडे असलेली ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकांची यादीही अॅपसोबत उमेदवारांना देण्यात येत आहे.
कापडाच्या वापरामुळे दरात वाढ झाल्याचे चित्र
कापडाच्या वापरामुळे प्रचार साहित्य महागल्याचे विक्रेते शमशोद्दीन बारगीर व सुनील मोतुगडे यांनी सांगितले. मोठ्या सभा व कोपरा सभेसाठी खुर्च्या व ध्वनिक्षेपकाची सोय असलेल्या स्टेज व्हॅनचे प्रति दिवस १२ हजार रुपये, हायड्रोलिक एलईडी डिस्प्ले व्हॅनचे प्रति दिवस १० हजार रुपये भाडे आहे. उमेदवाराच्या एलईडी दिव्यांची सोय असलेल्या डेमो सायकलची सुमारे १० हजार रुपये किंमत आहे. उमेदवाराच्या प्रचाराचा ३० मिनिटांचा माहितीपट तयार करण्यासाठी १ लाख रुपये खर्च आहे. ८ रूपयांपासून ६० रूपयांपर्यंत झेंडे, बिल्ल्यांचा हार २० रुपये, डमी मतदान यंत्र ४०० रुपये, मफलर ३० रुपये अशा प्रचार साहित्याच्या किमती आहेत.
प्रचार खर्चाची होणार कागदोपत्री कसरत...
अॅपद्वारे उमेदवार मतदारांच्या मोबाईलवर पोहोचणार असले तरी, अडाणी, अशिक्षित व स्मार्ट फोन नसलेल्या मतदारांसाठी प्रचार पत्रके व मतदान स्लिपांचा वापर करावा लागणार आहे. महापालिका निवडणुकीत प्रथमच हायटेक प्रचार साधनांचा वापर होणार आहे. मात्र महागड्या हायटेक प्रचार साधनांचा वापर करणाऱ्या उमेदवारांना ५ लाख रुपये निवडणूक प्रचार खर्चाची मर्यादा न ओलांडण्याची कागदोपत्री कसरत करावी लागणार आहे.