प्रचारतोफा थंडावल्या!

By admin | Published: February 19, 2017 11:46 PM2017-02-19T23:46:20+5:302017-02-19T23:46:20+5:30

जि. प., पं. स. निवडणूक : उद्या मतदान यंत्रात बंद होणार उमेदवारांचे भवितव्य

Promotions stopped! | प्रचारतोफा थंडावल्या!

प्रचारतोफा थंडावल्या!

Next



सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गेल्या सहा दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचारतोफा रविवारी रात्री बारा वाजता थंडावल्या. दिग्गज नेत्यांनी सभांचा धुरळा उडवून दिल्याने, प्रचाराचा ‘संडे फिव्हर’ लोकांनी अनुभवला. उद्या, मंगळवारी मतदान होत असून, ५९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.
सांगली जिल्हा परिषदेच्या ६० जागांसाठी २२५ आणि पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ३६७ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांचे भवितव्य १६ लाख तीन हजार १४७ मतदारांच्या हाती आहे. प्रचारासाठी सहा दिवसांचाच कालावधी मिळाल्यामुळे सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांची पळापळ सुरू होती. प्रचाराचा अखेरचा दिवस रविवारी आल्याने राज्यातील दिग्गज नेते जिल्ह्यातील निवडणूक प्रचारात उतरले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडून त्यांनी रान उठविले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार राजू शेट्टी अशा दिग्गज नेत्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रचारसभा घेतल्या. पक्षीय विजयाचे दावे करतानाच, या स्टार प्रचारकांनी विरोधकांवर आरोपाच्या तोफा डागल्या. यंदा प्रथमच विविध आघाड्या बनल्याने, नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मोठ्या पक्षांनी सोयीनुसार आघाड्या केल्या आहेत.
रात्री बारापर्यंत प्रचाराला मुभा दिल्यामुळे नेते, उमेदवार, कार्यकर्ते यांनी पायाला भिंगरी लावून रविवारी प्रचार केला. मतदारांच्या भेटीगाठीच्या कार्यक्रमाने रविवारची रात्र जागविली. नागरिकांनाही निवडणुकांच्या या धुरळ्यात जागरण करावे लागले. प्रचार संपल्यामुळे पक्षीय नेत्यांनीही सुस्कारा सोडला आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून नेत्यांची जी धावपळ सुरू होती, तिला रविवारी रात्री विश्रांती मिळाली. (प्रतिनिधी)
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार अशा सर्वच दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार पतंगराव कदम, आमदार शिवाजीराव देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार विलासराव जगताप, आमदार अनिल बाबर, आमदार मोहनराव कदम, माजी आमदार विलासराव शिंदे, सदाशिवराव पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख, मानसिंगराव नाईक, पृथ्वीराज देशमुख अशा सर्वच पक्षांतील नेत्यांचे नातलग निवडणुकीस उभा राहिले आहेत. या नेत्यांसह खासदार राजू शेट्टी, आमदार सुमनताई पाटील, आमदार सुरेश खाडे, अजितराव घोरपडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मित्र आणि शत्रुत्वाचा गोंधळ
आघाड्यांच्या खिचडीमुळे एका मतदारसंघात मित्र असलेला पक्ष दुसऱ्या मतदारसंघात शत्रू आहे. हा अनुभव प्रत्येक पक्षालाच येत असल्यामुळे आरोपांच्या बाबतीतही गोंधळ सुरू आहे. एका बाजूला राष्ट्रवादीवर जोरदार टीका करणाऱ्या भाजपला दुसरीकडे राष्ट्रवादीला मित्र बनवावे लागले आहे. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीत काही ठिकाणी टोकाचा संघर्ष, तर काही ठिकाणी आघाडी झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेसुद्धा स्थानिक पातळीवर सोयीनुसार आघाडी केली आहे. नेत्यांच्या स्तरावरही मित्र आणि शत्रुत्वाचा सोयीनुसार खेळ रंगलेला आहे.

Web Title: Promotions stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.