प्रतापसिंह उद्यानात पक्षी संग्रहालयाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:18 AM2021-06-23T04:18:47+5:302021-06-23T04:18:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील प्रतापसिंह उद्यानात महापालिकेच्यावतीने पक्षी संग्रहालय उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील प्रतापसिंह उद्यानात महापालिकेच्यावतीने पक्षी संग्रहालय उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी जागेची पाहणी केली. उद्यानात अत्याधुनिक पक्षी संग्रहालय उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
महापालिका मुख्यालयाजवळील प्रतापसिंह उद्यान कधीकाळी सिंहांच्या डरकाळीने दणादणून जात होते. गेल्या पंधरा वर्षात या उद्यानाला अवकळा आली आहे. आता उद्यानात पक्षी व प्राणी संग्रहालय उभारण्यासाठी महापौरांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी भाजपचे गटनेते विनायक सिंहासने, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह उद्यानाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी पक्षिमित्रही उपस्थित होते.
सूर्यवंशी म्हणाले की, पक्षिमित्र व तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रत्येक जातीच्या पक्ष्यांसाठी वेगवेगळे पिंजरे तयार करण्याविषयी चर्चा झाली. संग्रहालयासाठी पक्षिमित्रांची एक तज्ज्ञ समितीही गठित केली जाणार आहे. या पक्षी संग्रहालयामध्ये बंदिस्त पिंजऱ्यामध्ये कोणते पक्षी ठेवता येतील, याबाबत वन विभागाकडून कायदेशीर मार्गदर्शन घेतले जाईल.
तसेच उद्यानातील काही भागामध्ये मत्स्य संग्रहालय निर्माण करण्यावरही चर्चा झाली. तसा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
यावेळी नगरसेवक प्रकाश मुळके, राष्ट्रवादी पक्षाचे नेते शेखर माने, शहर अभियंता संजय देसाई, आरोग्याधिकारी रवींद्र ताटे, उद्यान अधिक्षक गिरीश पाठक, स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर वास्तुविशारद अभिषेक व्होरा, पक्षिमित्र संजय शिंदे, शरद आपटे, सचिन शिंगारे, अजित काशिद, किरण नाईक, मेघदीप कुदळे आदी उपस्थित होते._