कुपवाडमधील आरक्षण रद्दचा प्रस्ताव फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:24 AM2020-12-24T04:24:38+5:302020-12-24T04:24:38+5:30
सांगली : कुपवाड येथील प्राथमिक शाळा व क्रीडांगणाचे आरक्षण उठविण्यावरून बुधवारी महापालिका सभेत सत्ताधारी भाजप व विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांत ...
सांगली : कुपवाड येथील प्राथमिक शाळा व क्रीडांगणाचे आरक्षण उठविण्यावरून बुधवारी महापालिका सभेत सत्ताधारी भाजप व विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांत जोरदार ताणाताणी झाली. नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची भूमिका भाजपने घेतली, तर केवळ श्रेयवादासाठी भाजपने ऐनवेळी भूमिका बदल्याचा आरोप विरोधकांनी केला. अखेर महापौर गीता सुतार यांनी आरक्षण रद्दचा प्रस्ताव फेटाळत वादावर तात्पुरता पडदा टाकला.
महापालिकेची ऑनलाईन सभा महापौरांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत कुपवाड येथील आरक्षण उठविण्याचा विषय होता. काँग्रेसचे संतोष पाटील, विष्णू माने, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, शेडजी मोहिते यांनी आरक्षण उठविण्याचे जोरदार समर्थन केले. भाजपच्या कल्पना कोळेकर, राजेंद्र कुंभार म्हणाले की, आरक्षण उठविण्यावरून भाजपवर आरोप झाले आहेत. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन हा विषय मार्गी लावण्यासाठी तो प्रलंबित ठेवावा.
त्याला आक्षेप घेत संतोष पाटील म्हणाले की, आरक्षण उठवण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीचे विष्णू माने यांनी आणला आहे. त्यामुळे त्यांना याचे श्रेय मिळू नये, यासाठी भाजपचे नगरसेवक विरोध करत आहेत. भाजपचे शेखर इनामदार यांनी आरोप फेटाळून लावला. यात श्रेयवाद कसला? गेले पंधरा दिवस यावरून भाजपची बदनामी झाली आहे. महापालिकेत सत्ताधारी भूखंडाचे श्रीखंड खात आहेत, सांगली विकणे आहेत, यासह अनेक आरोप करण्यात आले. याबाबत सविस्तर अभ्यास करण्यासाठी या विषय प्रलंबित ठेवण्यात येत आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.
विष्णू माने म्हणाले, भाजपने श्रेय घ्यावे, पण हे आरक्षण उठवावे. आरक्षित भूखंडावर ९५ गुंठे मोकळी जागा असल्याचे म्हणणे खोटे आहे. ३० वर्षांपासून येथे घरे आहेत. या गोरगरीब लोकांवर अन्याय का? हा निर्णय आजच्या सभेत घ्या, अन्यथा मतदान घ्या.
मात्र महापौर गीता सुतार यांनी हा प्रस्ताव रद्द केल्याचे जाहीर करत आरक्षित भूखंडाचा बाजार रोखला.
चौकट
गोळीबार आणि वाळू ठेकेदार
भाजपचे गटनेते युवराज बावडेकर यांनी काँग्रेसचे संतोष पाटील यांना डिवचत आरक्षण उठवण्यासाठी गोळीबार केल्याचा आरोप केला. त्याला पाटील यांनी जोरदार आक्षेप घेत, गोळीबार आरक्षण उठवण्यासाठी नव्हता, तर वैयक्तिक वादातून होता. सभा ऑनलाईन नसती, तर दाखवले असते. ते काय वाळूचे टेंडर आहे का, असा चिमटा बावडेकर यांना काढला.