सांगलीत१४ टोळ्यांविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:26 PM2018-07-15T23:26:41+5:302018-07-15T23:26:46+5:30
सांगली : महापालिका निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सांगली, मिरजेतील १४ टोळ्यांविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामध्ये ११५ गुंडांचा समावेश आहे. या गुंडांना पोलिसांनी ‘तुमच्याविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात येत आहे’, अशा नोटिसा बजाविल्या आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांच्यासमोर तडीपारी प्रस्तावांवर सुनावणी होणार आहे.
खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, गर्दी मारामारी, दहशत माजविणे, बेकायदा जमाव जमवून दंगा करणे, बेकायदा हत्यार बाळगणे, घरात घुसून दमदाटी करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, जुगार असे तीनपेक्षा जादा गुन्हे असलेल्या टोळ्यांची माहिती जमविण्यात आली आहे. सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर, मिरज शहर, मिरज ग्रामीण, गांधी चौक व कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास १४ टोळ्या गुन्हेगारीत सक्रिय आहेत. या टोळ्यांमध्ये ११५ गुंडांचा समावेश आहे. निवडणूक काळात त्यांच्याकडून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी या टोळ्यांविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते.
महापालिका क्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांनी टोळ्यांची व त्यामधील गुन्हेगारांची माहिती संकलित केली. त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती काढली. त्यानंतर प्रस्ताव तयार करुन ते स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना सादर केले आहेत. पिंगळे यांनी हे प्रस्ताव तपासून सुनावणीसाठी पोलीसप्रमुख शर्मा यांच्यासमोर सादर केले आहेत. कारवाईच्या दृष्टिक्षेपात असलेल्या ११५ गुंडांना संबंधित पोलीस ठाण्यांकडून नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. तुमच्याविरुद्ध दाखल असलेल्या तडीपार कारवाईच्या सुनावणीला हजर राहा, अशी सूचना या नोटिसीद्वारे करण्यात आली आहे. पुढील आठवड्यापर्यंत सुनावणीचे हे काम पूर्ण होऊन १४ टोळ्यांमधील हे सर्व गुंड सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार होऊ शकतात. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १४ गुंडांना महापालिका क्षेत्रात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
कारागृहात ५३ गुंड
यापूर्वीच्या निवडणुकीत नेहमीच दंगा करुन परिस्थिती तणावपूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांचीही यादी बनविण्यात आली आहे. या यादीमध्ये ५३ गुंड निघाले आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यांना निवडणुकीचे मतदान व मतमोजणी होईपर्यंत किमान दहा ते पंधरा दिवस कारागृहात स्थानबद्ध केले जाणार आहे. या कारवाईची पोलिसांकडून जोरदार तयारी सुरु आहे. यामध्ये सांगली, मिरज व कुपवाड शहरातील गुंडांचा समावेश आहे.
तात्पुरत्या तडीपारीत ११२ गुंड
काही गुंडांना निवडणूक कालावधीपुरते तडीपार करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये ११२ गुंड आहेत. साधारणपणे त्यांना पंधरा ते वीस दिवस सांगली जिल्ह्यातून तडीपार केले जाणार आहे. निवडणूक काळात त्यांच्याकडून शांततेचा भंग होऊ शकतो, असा विचार करुन पोलिसांनी या कारवाईचा निर्णय घेतला आहे. तात्पुरत्या तडीपारी प्रकरणाची सुनावणीही पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांच्यासमोरच होणार आहे.