अलमट्टीला जलसंपदाचे उपविभागीय कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 12:13 PM2024-02-27T12:13:15+5:302024-02-27T12:13:49+5:30

कृष्णा नदी अखंडित प्रवाहित ठेवण्यासाठी कोयनातून ४१०० क्यूसेकचा विसर्ग

Proposal to set up Sub-Divisional Office of Water Resources Department, Government of Maharashtra at Almatti Karnataka | अलमट्टीला जलसंपदाचे उपविभागीय कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव

अलमट्टीला जलसंपदाचे उपविभागीय कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव

सांगली : कर्नाटकातील अलमट्टी येथे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे उपविभागीय कार्यालय कायमस्वरूपी व्हावे, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार आहोत. यामुळे अलमट्टी धरणाच्या पुराची अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी पूरनियंत्रण समितीच्या शिष्टमंडळाला दिली. तसेच, कोयना धरणातून ४ हजार १०० क्यूसेकने विसर्ग करून कृष्णा नदी अखंडित प्रवाहित ठेवण्यात येईल, असेही त्यांनी आश्वासन दिले.

कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता पी. जी. वायचळ, पी. पी. माने, संजय कोरे, प्रसन्न कुलकर्णी, सुयोग हावळ आदी पदाधिकाऱ्यांनी सोमवारी अधीक्षक अभियंता पाटोळे, सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांची भेट घेतली. कृष्णा नदी कोरडी पडल्यामुळे सांगली, कुपवाड शहरासह कृष्णा काठच्या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच, पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी अधीक्षक अभियंता पाटोळे यांनी वरील माहिती दिली.

आयआयटीकडून कृष्णा खोऱ्यामधील पुराचा अभ्यास

चंद्रशेखर पाटोळे म्हणाले, कृष्णा खोऱ्यामध्ये महापूर नेमका कोणत्या कारणांमुळे येतो याचा अभ्यास सध्या सुरू आहे. शासनाने नियुक्त केलेल्या वडनेरे समितीने जे निष्कर्ष काढले आहेत, त्याबाबत अभ्यास सुरू आहे. या पुराचा अभ्यासासंदर्भातील काम रुरकीच्या आयआयटीकडे सोपवण्यात आले आहे. त्यांना आवश्यक ती माहिती आणि आकडेवारी पाठवली जात आहे. लवकरच महापूर येण्याची शास्त्रीय कारणे आपल्या हाती येणार आहेत.

पूररेषा नव्याने निश्चित होणार

पूरपट्ट्यामध्ये बेकायदेशीर व्यावसाय चालू असून, बांधकामेही झाली आहेत. सांगलीतील दोन पूल बांधतानाही त्यास जलसंपदा विभागाची परवानगी घेतली नाही. या कामांच्या चौकशीची मागणी सर्जेराव पाटील, विजयकुमार दिवाण यांनी केली. यावर अधीक्षक अभियंता पाटोळे यांनी पूररेषा नव्याने निश्चित करण्यात येणार आहे. त्या कामाची निविदाही प्रसिद्ध झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Proposal to set up Sub-Divisional Office of Water Resources Department, Government of Maharashtra at Almatti Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.