सोसायट्यांचे ठराव आजपासून
By Admin | Published: January 21, 2015 12:19 AM2015-01-21T00:19:00+5:302015-01-21T00:21:25+5:30
जिल्हा बँक निवडणूक : प्रारुप मतदार यादी करण्याचा कार्यक्रम सुरू
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. उद्या बुधवारपासून विकास सोसायट्यांच्या प्रतिनिधींचे ठराव घेण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून, सोसायट्यांना २० फेब्रुवारीपर्यंत प्रतिनिधी ठराव द्यावयाचे आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ३१ मेपूर्वी घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आता विभागीय सह. निबंधक राजेंद्रकुमार दराडे यांची निवडणूक अधिकारी म्हणून सहकार विभागाच्या प्राधिकरणाने नियुक्ती केली आहे. दराडे यांनी निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
जिल्हा बँकेची सभासद संख्या ३ हजार ९३७ आहे, तर ३६३ वैयक्तिक सभासद आहेत. त्यानुसार उद्यापासून जिल्हा बँकेच्या सभासद संस्था, विकास सोसायट्यांच्या प्रतिनिधींचे ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रतिनिधींचा ठराव ज्या-त्या तालुक्याचे उप अथवा सह. निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे दोन प्रतीत सादर करावे लागणार आहे. ठराव देण्याची अंतिम मुदत २० फेब्रुवारी आहे. संस्थांनी ठराव सादर करताना उपविधीतील तरतुदीचे पालन करून संचालक मंडळाची बैठक बोलाविणे बंधनकारक आहे. या बैठकीतील प्रतिनिधी नेमणुकीचा ठरावच ग्राह्य धरला जाणार असून, एकापेक्षा जादा ठराव केल्यास संबंधित संस्थेच्या सचिव व पदाधिकाऱ्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दराडे यांनी दिला आहे.
संस्थेच्या प्रतिनिधीमध्ये बदल करावयाची संधी मिळणार आहे. ज्या संस्थांच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊन नवीन संचालक मंडळ गठित झाले आहे, अशाच संस्थांच्या ठरावात बदल करून नवीन प्रतिनिधींचे नाव सुचविता येईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी यंदा सभासदांसोबतच थकित कृषी पतसंस्थांवरही गंडांतर येणार आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सह. निबंधक राजेंद्रकुमार दराडे यांनी जिल्हा बँकेच्या सभासद असलेल्या प्राथमिक कृषी पतसंस्था थकित असतील तर, अशा संस्थेच्या संचालकांना निवडणुकीसाठी अपात्र ठरविले आहे. या संस्थेच्या थकबाकीदार नसलेल्या एखाद्या सदस्याचा प्रतिनिधी म्हणून समावेश करण्याचा ठराव करून तो पाठवावा, असे ही आदेशात म्हटले आहे.
सभासद संख्या
सहकारी संस्था : ३९३७
व्यक्तिगत : ३६३
मतदार यादी कार्यक्रम
सभासद संस्थांकडून ठराव मागविणे : २१ जानेवारी ते २० फेब्रुवारी २०१५