रुग्ण संपल्याने चार कोविड रुग्णालयांचा सेवा बंदचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:27+5:302021-06-09T04:32:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागताच रुग्णालयेदेखील रिकामी होऊ लागली आहेत, त्यामुळे चार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागताच रुग्णालयेदेखील रिकामी होऊ लागली आहेत, त्यामुळे चार कोविड रुग्णालयांनी रुग्णसेवा बंद करण्याची परवानगी मागितली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे हे निदर्शक असून, ही बातमी दिलासा देणारी ठरली आहे.
महापालिका क्षेत्रातील एक व ग्रामीण भागातील तीन कोविड रुग्णालयांनी बंदसाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दिला आहे. प्रशासनाने त्याला अद्याप होकार दिलेला नाही. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट, गंभीर रुग्णांची संख्या, दररोज आढळणारे नवे रुग्ण, ऑक्सिजनवरील रुग्ण याचा विचार करता, तूर्त रुग्णालये बंद करता येणार नाहीत, असे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे. ही रुग्णालये १५ जानेवारीपर्यंत सुरु ठेवावीत, त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले आहे. दरम्यान, जिल्हा कोरोनाच्या कचाट्यातून बाहेर पडत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. अवघ्या दीड महिन्यांपूर्वी बेड मिळत नसल्याने रुग्णांना प्राण गमवावे लागत होते, त्या पार्श्वभूमीवर आता रुग्णालये रिकामी होऊ लागल्याने ही आनंदवार्ता ठरली आहे.
चौकट
पॉझिटिव्हिटी रेट साडेनऊ टक्क्यांवर
जिल्ह्यात सध्या ४६ कोविड रुग्णालये व ४२ डेडिकेटेड हेल्थ सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तेथे १ हजार ६६० रुग्ण दाखल आहेत. रविवारअखेर तब्बल १६ रुग्णालयांत एकही रुग्ण दाखल नाही. २६ रुग्णालयांमध्ये दहापेक्षाही कमी रुग्ण आहेत. नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. रविवारी पॉझिटिव्हिटी रेट ९.५६ टक्के इतका होता.
चौकट
या आहेत आनंदवार्ता
- १६ रुग्णालयांत एकही रुग्ण नाही
- २६ रुग्णालयांत १०पेक्षा कमी रुग्ण
- जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट रविवारी साडेनऊ टक्क्यांवर
- दररोजची नवी रुग्णसंख्या ५००पर्यंत घसरली
- आटपाडी, खानापूर, जत व कवठेमहांकाळमध्ये नवी रुग्णसंख्या २५पेक्षाही कमी
- महापालिका क्षेत्रात रविवारी फक्त एक मृत्यू
कोट
चार रुग्णालयांनी बंदचा प्रस्ताव दिला आहे, पण आम्ही परवानगी दिलेली नाही. आयसीएमआरच्या निकषांनुसार जिल्ह्यात अद्याप गंभीर रुग्ण आहेत, त्यामुळे रुग्णालये रिकामी असली तरी बंद करता येणार नाहीत. या संदर्भात १५ जूननंतर प्रशासन निर्णय घेईल.
- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक