Sangli News: रेल्वेची क्वाडलाईन मालवाहतुकीसाठी, विभागीय व्यवस्थापकानी केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 06:39 PM2022-12-31T18:39:07+5:302022-12-31T18:39:31+5:30
मिरज स्थानकावरील ‘मिरज जंक्शन’ फलक येत्या तीन-चार दिवसांत बसवला जाईल
मिरज : मिरजेत कोल्हापूर व सोलापूर रेल्वेमार्ग जोडणारी प्रस्तावित क्वाडलाईन मालवाहतुकीसाठी असल्याने प्रवासी गाड्यांवर त्याचा परिणाम होणार नसल्याचे विभागीय व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांनी स्पष्ट केले.
मध्य रेल्वे पुणे विभागीय व्यवस्थापक इंदुमती दुबे यांनी शुक्रवारी मिरज व सांगली स्थानकाचा पाहणी दौरा केला. यावेळी रेल्वे कृती समिती अध्यक्ष मकरंद देशपांडे, विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत, सचिव सुकुमार पाटील, रेल्वे प्रवासी सेनेचे संदीप शिंदे, राजेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित हारगे यांनी त्यांची भेट घेतली.
यावेळी दुबे म्हणाल्या की, प्रस्तावित क्वाडलाईनचा वापर प्रामुख्याने मालवाहतूक गाड्यांसाठी आहे. या क्वाडलाईनचे स्थानक मिरज जंक्शन परिसरात उभारण्यात येईल. मिरज जंक्शन व क्वाडलाईन स्थानक ओव्हरब्रीज व रस्त्याने जोडण्यात येणार असल्याने प्रवाशांना ते सोयीचे होणार आहे. प्रस्तावित क्वाडलाईनमुळे रेल्वेगाड्या मिरज जंक्शनवर न येता परस्पर बाहेरून जातील या केवळ अफवा आहेत. मिरज स्थानकावरील ‘मिरज जंक्शन’ फलक येत्या तीन-चार दिवसांत बसवला जाईल.
स्थानकाबाहेरील रस्ता व पाण्याचा निचरा करणारे ड्रेनेज व गटारीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. क्वाडलाईनमुळे मिरजेपासून लांब अंतरावर स्थानक उभारण्यात येणार असल्याच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला.
मिरज रेल्वे जंक्शन बचाव कृती समितीचे ॲड. ए. ए. काझी, जहीर मुजावर, अक्षय वाघमारे, राकेश तामगावे, इंद्रजित घाटे, शकील पीरजादे यांनीही दुबे यांची भेट घेऊन क्वाडलाईनबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यावर मिरज जंक्शनचे महत्व कमी करणारा कोणताही निर्णय रेल्वे प्रशासन घेणार नसल्याची ग्वाही विभागीय व्यवस्थापक श्रीमती दुबे यांनी शिष्टमंडळाला दिली.