वेश्या व्यवसाय; कडेगावच्या वकिलास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:18 PM2018-11-25T23:18:29+5:302018-11-25T23:18:34+5:30
सांगली : सांगली व सातारा जिल्ह्यात वेश्या व्यवसायासाठी मुलींची तस्करी करणाऱ्या टोळीत रायगाव (ता. कडेगाव) येथील राहुल ऊर्फ दादासाहेब ...
सांगली : सांगली व सातारा जिल्ह्यात वेश्या व्यवसायासाठी मुलींची तस्करी करणाऱ्या टोळीत रायगाव (ता. कडेगाव) येथील राहुल ऊर्फ दादासाहेब संभाजी पवार (वय ३५) या वकिलाचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून उजेडात आली आहे.
त्याला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून आलिशान मोटारही जप्त करण्यात आली आहे. तो मुंबईतील वाशीमधून मुलींची तस्करी करीत असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आली असल्याचे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांनी सांगितले.
वेश्या व्यवसायासाठी मुलींची तस्करी केल्याप्रकरणी दत्तात्रय महादेव नाईक (२६, रा. आरग, ता. मिरज) व नीशा राकेश जाधव (१९, कोल्हापूर) यांना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती.
त्यांच्या ताब्यातून एका पीडित मुलीची सुटका करण्यात आली होती. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीतून राहुल पवार याचे नाव निष्पन्न झाले होते. त्यानेच त्याच्या आलिशान मोटारीतून वेश्या व्यवसायासाठी मुलीला सांगलीत आणून दत्तात्रय नाईक व नीशा जाधव या दोघांच्या ताब्यात दिले
होते.
पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे, पलूसचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांच्या पथकाने शनिवारी रात्री उशिरा रायगाव येथे छापा टाकून राहुल पवार याला अटक केली. त्याच्या घराबाहेर मुलींच्या तस्करीसाठी वापरण्यात येणारी मोटार (क्र. एमएच १४ बीएक्स-६४९२) होती. तीही जप्त करण्यात आली. रविवारी दुपारी पवारला न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला
आहे.