सांगलीतील जुना बुधगाव रस्त्यावरील पुलाच्या कामास विरोध

By अविनाश कोळी | Published: July 9, 2024 07:13 PM2024-07-09T19:13:15+5:302024-07-09T19:13:48+5:30

नागरिक जागृती मंचकडून काम थांबविण्याची मागणी

Protest against bridge work on old Budhgaon road in Sangli | सांगलीतील जुना बुधगाव रस्त्यावरील पुलाच्या कामास विरोध

सांगलीतील जुना बुधगाव रस्त्यावरील पुलाच्या कामास विरोध

सांगली : चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत जुना बुधगाव रस्त्यावरील उड्डाणपूलाच्या कामास परवानगी देऊ नये, अशी मागणी नागरिक जागृती मंचने केली आहे.

निवेदनात मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी म्हटले आहे की, १३ जुलैपासून जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरु होणार आहे. याठिकाणी पर्यायी मार्ग काढण्यात आला आहे. मात्र, तो पुरेसा नाही. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होणार आहे. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेने या कामासाठी अद्याप नाहरकत दिलेली नाही. महावितरणने खांब स्थलांतरीत केलेले नाहीत. जलवाहिन्याही स्थलांतरीत झालेल्या नाहीत. अशा स्थितीत हे काम चुकीच्या पद्धतीने रेटण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पुलाच्या कामासाठी व वाहतूक वळविण्याबाबत परवानगी दिलेली आहे. चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपूल पूर्ण होत नाही तोपर्यंत जुना बुधगाव रस्त्यावरील काम सुरु करण्यास परवानगी देण्यात येऊ नये. ठेकेदाराला मुदत वाढवून देण्यासाठी रेल्वे प्रशासनास विनंती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

खासदारांना आवाहन

खासदार विशाल पाटील यांनी याप्रश्नी लक्ष घालावे. नागरिकांच्या संभाव्य त्रासाचा विचार करुन हे काम थांबवावे. सांगली जिल्ह्यातील रेल्वे पुलांची कामे तसेच रेल्वे स्थानक विकास आराखड्याबाबत रेल्वे मंत्री किंवा रेल्वे प्रशासनाबरोबर बैठक आयोजित करावी, असे आवाहन मंचने केले आहे.

Web Title: Protest against bridge work on old Budhgaon road in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.