सांगलीत जनता दलातर्फे निषेध दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 02:35 PM2020-06-25T14:35:23+5:302020-06-25T14:38:05+5:30
जनता दल (सेक्युलर)च्यावतीने गुरुवारी सांगलीत आणीबाणी निषेध दिनानिमित्त निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना जयंतीनिमितत्त अभिवादनही करण्यात आले.
सांगली : जनता दल (सेक्युलर)च्यावतीने गुरुवारी सांगलीत आणीबाणी निषेध दिनानिमित्त निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना जयंतीनिमितत्त अभिवादनही करण्यात आले.
जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील स्टेशन चौकात महात्मा गांधींच्या पुतळ््यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पाटील म्हणाले की, २५ जून १९७५ रोजी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांच्यासह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते.
वृत्तपत्र स्वातंत्र्यावर निर्बंध लादून त्यांची गळचेपी केली. आणीबाणीचा काळ देशाच्या इतिहासातील काळेकुट्ट पर्व ठरले. लोकशाहीचा मुडदा पाडला गेला. याचा निषेध म्हणून जनता दलाच्यावतीने आणीबाणी निषेध दिन पाळण्यात आला.
त्याचबरोबर २५ जून हा भारताचे माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांचा जन्मदिन आहे. पंतप्रधान म्हणून त्यांनी मंडल आयोग लागू करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. त्यामुळे देशातील बहुजन, ओ.बी.सी.ना न्याय मिळाला व त्यांचा विकास आणि प्रगतीचे नवे पर्व सुरू झाले. त्यामुळे जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमही घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. आंदोलनात जनता दलाचे अॅड. के. डी. शिंदे, अॅड. फैय्याज झारी, डॉ. जयपाल माळी, राजेंद्र कोलप, शशिकांत गायकवाड आदी सहभागी झाले होते.