महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात कडेगावात निषेध मोर्चा, पाणी संघर्ष समिती व सर्वपक्षीय संघटना आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 07:24 PM2023-05-10T19:24:24+5:302023-05-10T19:25:08+5:30
कडेगाव : वीज दरवाढ कमी करावी,शेतकर्यांना अखंड आठ तास वीज पुरवठा करावा,धोकादायक तारा, पोल व डी पी दुरुस्ती करावे ...
कडेगाव : वीज दरवाढ कमी करावी,शेतकर्यांना अखंड आठ तास वीज पुरवठा करावा,धोकादायक तारा, पोल व डी पी दुरुस्ती करावे ,सतत होणारा विजेचा खेळखंडोबा थांबवावा आदी मागण्यासाठी कडेगाव शहरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयावर सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पाणी संघर्ष चळवळ समिती व सर्व पक्षीय संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तसेच शेतकऱ्यांनी हल्लाबोल आंदोलन करून निषेध मोर्चा काढला. यावेळी अनोलकांनी हलगी वाजवत तसेच महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
विजेच्या समस्याबाबत व प्रलंबित मागण्यासाठी बुधवार ( दि 10 ) रोजी सकाळी 10 वा च्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून संतप्त शेतकऱ्यांनी मोर्चास सुरुवात केली.यावेळी शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा शहरातून थेट महावितरणच्या मुख्य कार्यालयावर धडकला.शेतीला व घरगुती वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे.यामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे.पाणी असून ही वीज अभावी पिके वाळून जात आहेत.तर जुलमी वीज दर वाढ कमी करावी. व विज बिल अभावी कोणत्याही शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडू नये.
शेतात लोंबकळत असलेल्या विजेच्या तारांमुळे राज्यात अनेक ठिकाणी जीवित हानी झाली आहे.त्यामुळे लोंबकळत असलेल्या विजेच्या तारा सुस्थितीत जोडव्यात.शेती पंपा करीता नवीन वीज जोडणी कोणताही भ्रष्टाचार न करता जोडावी.यासह आदी मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली.अन्यथा 9 जुन ला आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते देशमुख यांनी दिला.यावेळी पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांच्या मार्गदरशनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यावेळो विजय शिंदे, संतोष डांगे, विजय गायकवाड, दीपक न्यायणीत, शशिकांत रासकर, मनोजकुमार मिसळ, सिद्दिक पठाण, प्रकाश गायकवाड, वसंत इनामदार, मोहन जाधव, जयवंतराव पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांना घेराव
महावितरण कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शशिकांत पाटील यांना आंदोलकांनी घेराव घातला. विजेच्या समस्यासह अन्य मागण्यांबाबत विचारणा केली.यावेळी सदर मागण्याबाबत वरिष्ठना कळवण्यात आले आहे.तर तालुक्यातील व शहरातील वीज समस्या सोडवल्या जातील असे पाटील यांनी सांगितले.