सांगली, मिरजेत वकिलांचे धरणे आंदोलन
By admin | Published: December 12, 2014 10:48 PM2014-12-12T22:48:49+5:302014-12-12T23:34:44+5:30
कामकाजावर बहिष्कार : उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात करण्याची मागणी
सांगली : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी आज, शुक्रवार वकील संघटनेच्यावतीने न्यायालयीन कामजावर बहिष्कार टाकण्यात आला. न्यायालयाच्या परिसरात दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष अॅड. महेश जाधव यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
गेल्या दोन वर्षांपासून सांगलीसह सहा जिल्ह्यांतील वकिलांचे खंडपीठासाठी आंदोलन सुरु आहे. गतवर्षी तब्बल महिनाभर आंदोलन झाले होते. मात्र खंडपीठ करण्याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. यामुळे सहा जिल्ह्यांतील वकिलांनी पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज सर्व वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला. न्यायालयीन कामकाजापासून शेकडो वकील अलिप्त राहिल्याने त्याचा मोठा परिणाम झाला. वकिलांनी दिवसभर न्यायालयाच्या परिसरात धरणे आंदोलन केले.
या आंदोलनात अॅड. महेश जाधव, सहायक सरकारी वकील एस. एम. पखाली, सचिन पाटील, अरविंद देशमुख, प्रदीप पोळ, अॅड. सुधीर जाधव, अॅड. अर्चना पाटील, अशोक वाघमोडे, प्रकाश साळुंखे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मिरज : मिरजेत वकिलांनी धरणे आंदोलन करून कामकाजावर बहिष्कार टाकला. उच्च न्यायालयाच्या आश्वासनावरून खंडपीठ कृती समितीने आंदोलन स्थगित केले होते. मात्र खंडपीठाचे आश्वासन पूर्ण न झाल्याने कृती समितीने पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. मिरजेत न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून वकील संघटनेने न्यायालयाच्या प्रवेशद्वारात धरणे आंदोलन केले. संघटनेचे अध्यक्ष अॅड. फैय्याज झारी, अॅड. मनीष कांबळे, अॅड. महेंद्र कोरे, अॅड. उमेश बावचीकर, अॅड. संभाजी बंडगर, अॅड. समीर हंगड, अॅड. चिमण लोकूर, अॅड. एस. एस. इसापुरे आदी आंदोलनात सहभागी होते.
महालोकअदालतीवर आज बहिष्कार
उद्या (शनिवार) न्यायालयात महालोकअदालत आयोजित केली आहे. यामध्ये हजारो खटले निकालात काढण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. मात्र यावरही वकिलांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे न्यायालयीन व्यवस्था, प्रशासन, पोलीस यांनाच ही महालोकअदालत यशस्वी पार पाडण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.