अंगणवाडी सेविकांनी सरकारविरोधात लाटणे घेतले हाती, सांगलीत मोर्चा
By संतोष भिसे | Published: December 18, 2023 07:25 PM2023-12-18T19:25:31+5:302023-12-18T19:27:01+5:30
सांगली : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सोमवारीही सुरूच राहिले. मानधनवाढीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सेविका व मदतनिसांनी आज जिल्हा परिषदेवर लाटणे ...
सांगली : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सोमवारीही सुरूच राहिले. मानधनवाढीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सेविका व मदतनिसांनी आज जिल्हा परिषदेवर लाटणे मोर्चा काढला. त्यांची मुलेही आंदोलनात सहभागी झाली. आमच्या आईचे मानधन वाढवा, अशी हाक देत मुलांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू आहे. आज लाटणे मोर्चा काढत त्यांनी आंदोलनाची तीव्रता वाढविली. शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. घेतल्याशिवाय राहत नाही म्हणत आवाज बुलंद केला.
सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता द्या, त्यांच्याप्रमाणे वेतनश्रेणी, भविष्य निर्वाह निधीचा लाभ द्या, सेविकांना दरमहा २६ हजार आणि मदतनिसांना २० हजार रुपये मानधन द्या, महागाई निर्देशांकानुसार प्रत्येक सहा महिन्यांनी मानधनात वाढ करावी, महापालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांसाठी पाच ते आठ हजार रुपये भाडे मंजूर करा, नवा मोबाइल द्यावा, मिनी अंगणवाड्यांचे रुपांतर मोठ्या अंगणवाडीत करावे, प्राथमिक शाळांप्रमाणे रजा, सुट्ट्या द्याव्यात आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन सुरू आहे.
आंदोलनाचे नेतृत्व संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा आनंदी भोसले, जिल्हा कार्याध्यक्षा विजया जाधव, अलका माने, मधुमती मोरे, राणी जाधव आदी करीत आहेत.