दिवाळीपूर्वी किमान १० हजार रुपये भाऊबीज द्या, आशा कार्यकर्त्यांची मागणी
By संतोष भिसे | Published: October 26, 2023 06:37 PM2023-10-26T18:37:17+5:302023-10-26T18:38:08+5:30
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
सांगली : आशा कार्यकर्त्या व गटप्रवर्तक महिलांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. तत्पूर्वी मिरज-सांगली रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र राज्य आशा, गट प्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीस सुमन पुजारी यांनी नेतृत्व केले.
दरमहा किमान २६ हजार रुपये वेतन, गटप्रवर्तकांना दरमहा ८४५० रुपये प्रवास भत्ता, ऑनलाइन कामाची सक्ती नको, दिवाळीपूर्वी किमान १० हजार रुपये भाऊबीज आदी मागण्या आंदोलकांनी केल्या. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
पुजारी म्हणाल्या, राज्यातील अन्य काही महापालिका व जिल्हा परिषदांनी दिवाळी भाऊबीज घोषित केली आहे. सांगलीतही तशी घोषणा करावी. यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभर संप सुरू आहे, तो मागे घेणार नाही. गट प्रवर्तक महिलांना कंत्राटी कामाचे आदेश देऊन अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवाशर्ती लागू केल्या आहेत, पण त्यांच्याप्रमाणे वेतनवाढीस नकार देऊन अन्याय केला जात आहे.
आंदोलनात विद्या कांबळे, इंदुमती यलमार, राखी पाटील, सुषमा पाटील, अंजली पाटील, संगीता बेडगे, वनिता हिप्परकर, शारदा गायकवाड, शोभा पाटील, सुनीता कुंभार, उर्मिला पाटील, मनीषा कदम, अफसाना शिकलगार, मनीषा पाटील, विद्या पाटील आदी सहभागी झाल्या.