विमानतळ रद्द ठरावाची सांगलीत होळी, बचाव कृती समितीचे आंदोलन
By शीतल पाटील | Published: March 7, 2023 03:51 PM2023-03-07T15:51:53+5:302023-03-07T15:53:00+5:30
टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करणार
सांगली : कवलापूर विमानतळ रद्द करण्याचा ठराव व ही जागा एमआयडीसीकडे वर्ग करण्याच्या शासन निर्णयाची विमानतळ बचाव कृती समितीच्यावतीने होळी करण्यात आली.
यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, कृती समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, माजी नगरसेवक हणमंत पवार, शिवेसना ठाकरे गटाचे शंभोराज काटकर, काँग्रेसचे आशीष कोरी, डाॅ. संजय पाटील, हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम, काॅ. उमेश देशमुख, वाहतुकदार संघटनेचे महेश पाटील, किरणराज कांबळे, प्रशांत भोसले, नीलेश पवार, आनंद देसाई उपस्थित होते.
कवलापूर येथील विमानतळासाठी आरक्षित जागा एमआयडीसीकडे वर्ग करण्यात आली आहे. २००९ मध्ये विमानतळ रद्दचा ठराव मंत्रीमंडळात झाला होता. तर २०१५ मध्ये जागा एमआयडीसीकडे सोपविण्यात आली. एमआयडीसीकडून या जागेवर उद्योग उभारण्यासाठी खासगी कंपनीला विकण्याचा घाट घातला गेला होता. पण कृती समितीने आंदोलन करून हा डाव हाणून पाडला.
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांची भेट घेऊन जिल्ह्यात विमानतळ सुरू करण्याची मागणी केली आहे. नुकतेच कृती समितीची बैठक झाली असून टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र केले जाणार आहे. तत्पूर्वी होळीच्या निमित्ताने या दोन्ही ठरावाचे दहन करण्यात आल्याचे सतीश साखळकर यांनी सांगितले.