इस्लामपुरात काँग्रेसतर्फे निदर्शने
By admin | Published: January 23, 2016 12:28 AM2016-01-23T00:28:20+5:302016-01-23T00:50:37+5:30
केंद्र, राज्य शासनाचा निषेध : दुहेरी खुनाची सीबीआय चौकशीची मागणी
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील डॉ. कुलकर्णी दाम्पत्याच्या खून प्रकरणाचा सीबीआयमार्फत तपास करून सूत्रधारांचा छडा लावा, तालुक्यातील गुंडगिरी आणि अवैध धंदे मोडीत काढा, यांसह हैदराबादमधील मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित मंत्री व विद्यापीठाच्या कुलगुरुंवर कारवाई करा, या मागणीसाठी शुक्रवारी शहर काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. तसेच जातीयवादी केंद्र-राज्य सरकारचा निषेध केला.
येथील जुन्या तहसील कचेरीसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार रूपाली सरनोबत यांना निवेदन देण्यात आले. जितेंद्र पाटील म्हणाले की, केंद्र व राज्यातील भाजप सरकार जातीयवादी आहे. भांडवलदारांचे संरक्षण करणारे हे सरकार आहे. दलित-अल्पसंख्य समाज दहशतीच्या वातावरणात आहेत. याचा आम्ही निषेध करतो.
इस्लामपूरचे दादासाहेब पाटील म्हणाले की, इस्लामपूर शहरात गुंडगिरी फोफावली आहे. डॉक्टर दाम्पत्याच्या खुनातील सूत्रधार नामानिराळे राहिले आहेत. त्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी.
प्रतापराव मोरे म्हणाले की, तालुक्यात खमक्या पोलीस अधिकाऱ्याची गरज आहे. अॅड. आर. आर. पाटील म्हणाले की, पुरोगामी तालुक्यात चार महिन्यात सहा खून पडले. दुहेरी खुनात चोरीची शक्यता नाकारणारे पोलीस आता चोरीतून खून झाल्याचे सांगत आहेत. पण हे न पटणारे आहे.
हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी रोहित चक्रवर्ती वेमुला याच्या आत्महत्येचा सखोल तपास करावा, याप्रकरणी केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रय यांच्यासह कुलगुरुंवर कारवाई करावी, वाळवा तालुक्यातील मटका बंद करावा, डॉ. कुलकर्णी दाम्पत्याच्या खूनप्रकरणी सीबीआय चौकशी करावी, अशा मागण्या तहसीलदार सरनोबत यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी निषेधाच्या घोषणाही आंदोलनकर्त्यांनी दिल्या.
यावेळी दादासाहेब पाटील (बोरगाव), राजू वलांडकर, दीपक लकेसर, पी. वाय. शिंदे, हिंदुराव वाटेगावकर, अनिल निकम, पृथ्वीराज पाटील, डी. आर. पाटील, नामदेव यादव, राजू सावकर, धनाजी सावंत, अर्जुन खरात, मिलिंद पाटील, आकिब नायकवडी, प्रवीण जाधव, भाऊ पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
इस्लामपुरात गुंडगिरी : बंदोबस्ताची मागणी
इस्लामपूर शहरात गुंडगिरी फोफावली आहे. डॉक्टर दाम्पत्याच्या खुनातील सूत्रधार नामानिराळे राहिले आहेत. त्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. तालुक्यात खमक्या पोलीस अधिकाऱ्याची गरज आहे, अशी मागणी यावेळी अनेक आंदोलनकर्त्यांनी केली.