मराठा क्रांती मोर्चाची महावितरणसमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:03 AM2020-12-05T05:03:15+5:302020-12-05T05:03:15+5:30
सांगली : महावितरणमध्ये उपकेंद्र सहायक पदाच्या नोकर भरतीमधील कागदपत्रांची पडताळणी दोन दिवसांपूर्वी झाली आहे. यामध्ये मराठा समाजातील तरुणांनी एसईबीसी ...
सांगली : महावितरणमध्ये उपकेंद्र सहायक पदाच्या नोकर भरतीमधील कागदपत्रांची पडताळणी दोन दिवसांपूर्वी झाली आहे. यामध्ये मराठा समाजातील तरुणांनी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केला होता. त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सांगलीत विश्रामबाग येथील महावितरण कार्यालयासमोर त्यांनी निदर्शने केली.
महावितरणमध्ये उपकेंद्र सहायक पदासाठी नोकर भरतीच्या कागदपत्रांची दि. १ आणि २ डिसेंबर रोजी छाननी झाली आहे. यामध्ये एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली नाही. मराठा समाजातील एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. मराठा समाजातील तरुणांवर झालेला हा अन्याय आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी केला आहे. राज्य सरकार आणि महावितरणच्या प्रशासनाने तातडीने मराठा समाजातील एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना न्याय द्यावा आणि कागदपत्रांची छाननी केली पाहिजे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पाटील यांनी दिला.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई, राहुल पाटील, धनंजय शिंदे, संतोष माने, किरण भुजगडे, विजय धुमाळ, अशोक पाटील-कोकळेकर, प्रवीण पाटील, सतीश साखळकर, महेश खराडे, शंभोराज काटकर आदी आंदोलनात सहभागी होते.
चौकट
निर्णयापर्यंत भरती थांबवा
सरकार नोकरभरती करणार असेल, तर मराठा समाजातील तरुणांना त्यांनी एसईबीसी प्रवर्गातून संधी दिली पाहिजे. नाही तर जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत शासनाने नोकरभरती बंद ठेवावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.