मिरजेत लिंगायत समाजातर्फे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:26 AM2021-05-18T04:26:59+5:302021-05-18T04:26:59+5:30
मिरज : दफनक्रियेसाठी अनुदान थकीत असल्याने महापालिका क्षेत्रातील सर्व लिंगायत दफनभूमीत मृतदेह दफन करण्यासाठी पैसे द्यावे ...
मिरज : दफनक्रियेसाठी अनुदान थकीत असल्याने महापालिका क्षेत्रातील सर्व लिंगायत दफनभूमीत मृतदेह दफन करण्यासाठी पैसे द्यावे लागत आहेत. मोफत अंत्यविधीची व्यवस्था करावी या मागणीसाठी लिंगायत समाजातर्फे मिरजेत महापालिका कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
महापालिकेने गेल्या नऊ महिन्यापासून महापालिका क्षेत्रात लिंगायत स्मशानभूमीस साहित्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचे बिल दिले नसल्याने साहित्य पुरवठा बंद झाला आहे. यामुळे खड्डा खोदण्यास व अंत्यविधीसाठी इतर साहित्यासाठी ठेकेदारांकडून तीन हजार रुपये घेण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य पुरवण्यात येत आहे. मात्र लिंगायत दफनभूमीतच साहित्य पुरवठा बंद करण्यात आला आहे. अंत्यविधीसाठी साहित्य पुरवठा सुरू करून कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही याची महापालिकेने व्यवस्था करावी. या मागणीसाठी महापालिका कार्यालयासमोर लिंगायत बांधवांनी आंदोलन केले.
यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांना निवेदन देण्यात आले. दोन दिवसात याबाबत व्यवस्था न झाल्यास महापालिका कार्यालयात मृतदेह ठेवून आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी लिंगायत समाजाचे नेते महादेव कुरणे, नगरसेवक गणेश माळी, बाबासाहेब आळतेकर, ईश्वर जनवाडे, उमेश हारगे, राहुल कुंभारकर, विक्रम पाटील, श्रीकांत महाजन, मनोहर कुरणे, रावसाहेब मोतुगडे, प्रवीण यादवडे, सुनील कित्तुरे, मधुकर सनके, अजिंक्य कत्तीरे, राहुल छाचवाले उपस्थित होते.