मिरजेत कत्तलखाना बंदसाठी बेडग रस्त्यासमाेर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:48+5:302021-07-14T04:30:48+5:30
मिरज : मिरजेत बेडग रस्त्यावरील महापालिकेचा कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीसाठी मिरज पंचायत समिती सभापती, उपसभापती, सर्वपक्षीय सदस्य व ...
मिरज : मिरजेत बेडग रस्त्यावरील महापालिकेचा कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीसाठी मिरज पंचायत समिती सभापती, उपसभापती, सर्वपक्षीय सदस्य व कत्तलखाना परिसरातील ग्रामस्थांनी निदर्शने केली. पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी आत्मदहन आंदोलन काही काळासाठी स्थगित करून निदर्शने केली. कत्तलखाना प्रश्नी चर्चेसाठी पंचायत सदस्यांसोबत मंगळवारी मनपा आयुक्तांची बैठक होणार आहे.
बेडग रस्त्यावरील कत्तलखान्याच्या प्रदूषणामुळे या परिसरासह आजूबाजूच्या सात गावांतील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोकादायक ठरत असल्याने, तो कायमचा बंद करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य करीत आहेत. महापालिकेने कत्तलखाना बंद न केल्यास सोमवारी आत्मदहनाचाही इशारा देण्यात आला होता. त्यामुळे कत्तलखान्यासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी लागू असल्याने आंदोलकांनी कत्तलखान्यासमोर निदर्शने करून, महापालिका आरोग्याधिकारी डॉ.सुनील आंबोळे यांना निवेदन दिले. यावेळी महापालिका आयुक्त आणि आरोग्याधिकारी डॉ.आंबोळे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. याबाबत आयुक्तांसोबत बैठकीत योग्य तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी सभापती गीतांजली कणसे, उपसभापती अनिल आमटवणे, सदस्य अशोक मोहिते, विक्रम पाटील, किरण बंडगर, बोलवाडचे सरपंच सुहास पाटील, सुलेमान मुजावर, सचिन कांबळे, माजी सभापती दिलीप बुरसे-पाटील यांच्यासह बोलवाड, वड्डी, टाकळीचे परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.