सगळ्याच पक्षांकडून प्रस्थापितांची सोय: वारसदारांना उमेदवारीचे लाल कार्पेट -सांगली निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 10:22 PM2018-07-13T22:22:28+5:302018-07-13T22:22:48+5:30
महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या, तरुण कार्यकर्त्यांना संधी मिळेल, ही अपेक्षा फोल ठरली आहे. आजी-माजी नगरसेवकांसह राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपापल्या वारसदारांचीच सोय लावली आहे.
सांगली : महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या, तरुण कार्यकर्त्यांना संधी मिळेल, ही अपेक्षा फोल ठरली आहे. आजी-माजी नगरसेवकांसह राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपापल्या वारसदारांचीच सोय लावली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप या तीन प्रमुख पक्षांच्या उमेदवार यादीत प्रस्थापितांचाच भरणा अधिक असून, त्यांच्यावरच भरवसा दाखविल्याने नाराजांची संख्याही वाढली आहे.
राजकारणात सक्रिय होण्याचा राजमार्ग असलेल्या महापालिकेच्या निवडणुकीवर प्रस्थापितांनी हक्क दाखवत आपल्या वारसदारांच्या नव्या प्रवासाचा श्रीगणेशा केला आहे. आपले कोणी तरी महापालिकेत पाहिजे, असा विचार करीत अनेकांनी नातलगांना पक्षाच्या तिकिटावर उभे केले आहे. त्यामुळे पक्षाच्या उमेदवारांसह कुटुंबातील उमेदवारांसाठीही प्रस्थापितांना काम करावे लागेल. घराणेशाहीसाठी काहींनी अन्य पक्षाच्या उमेदवाराशी साटेलोटे करीत छुपी युती केली आहे.
यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस ४५ जागांवर लढत आहे. काँग्रेसच्या उमेदवार यादीत विद्यमान नगरसेवकांना मोठ्या प्रमाणात स्थान दिले आहे. तब्बल १३ नगरसेवक पुन्हा रिंगणात उतरले आहेत. तसेच राष्ट्रवादी ३४ जागांवर लढत असून सर्वाधिक विद्यमान नगरसेवक या पक्षाकडे आहेत. राष्ट्रवादीने १५ विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय माजी नगरसेवक, त्यांच्या नातलगांवरही भरवसा दाखविला आहे. भाजपची महापालिकेतील संख्या केवळ दोन होती. पण भाजप उमेदवार यादीत मात्र ११ विद्यमान नगरसेवक आहेत. फोडाफोडीच्या राजकारणातून भाजपत प्रवेश करणाºया आयारामांना संधी देण्यात पक्षाने लवचिकता दाखविली आहे. अनेक ठिकाणी निष्ठावंतांना डावलून राजकीय पक्षांनी आयाराम गयारामांना संधी दिल्याने नाराजीचा विस्फोट झाला आहे.
माजी नगरसेवकांना लॉटरी
महापालिकेच्या ७८ नगरसेवकांपैकी ४० नगरसेवकांना विविध पक्षांकडून पुन्हा संधी मिळाली आहे. उर्वरित ३८ जणांचे पत्ते कापले गेले. त्यामुळे माजी नगरसेवकांनाही उमेदवारीची लॉटरी लागली आहे. काँग्रेसने वहिदा नायकवडी, अजित दोरकर, मदिना बारूदवाले, प्रमोद सूर्यवंशी, अजित सूर्यवंशी यांना, राष्ट्रवादीने हरिदास पाटील, ज्योती आदाटे यांना, भाजपने पांडुरंग कोरे, आनंदा देवमाने,बाळाराम जाधव, भारती दिगडे, स्वाती शिंदे, जयश्री कुरणे अशा माजी नगरसेवकांना संधी दिली आहे.
बातमीला जोड...
बाप-लेक, भाऊ-भाऊ, पती-पत्नी
‘घरच्यांसाठी काय पण...' अशी भूमिका घेत अनेकांनी आपल्या वारसदारांची पुढची राजकीय सोय केली आहे. त्यातून पती-पत्नी, वडील मुलगा, दीर भावजय अशा जोड्या उमेदवारांच्या रिंगणात दिसतात. माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी स्वत:सह मुलगा अतहर नायकवडी यांना तिकीट मिळविले आहे. मिरजेत संजय मेंढे व बबीता मेंढे हे पती-पत्नी पुन्हा रिंगणात उतरले आहेत. तेही एकाच प्रभागातून! गटनेते किशोर जामदार व त्यांचे पुत्र करण जामदारही नशीब अजमावत आहेत. माजी स्थायी समिती सभापती सुरेश आवटी यांनी यंदा विश्रांती घेत, आपली दोन्ही मुले संदीप व निरंजन यांना उमेदवारी मिळवून दिली आहे. माजी मंत्री मदन पाटील यांची नातलग व नानासाहेब महाडिक यांची कन्या रोहिणी पाटील दुसºयांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. काँग्रेसचे प्रमोद सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी स्वाती हे दोघेही वेगवेगळ्या प्रभागातून लढत आहेत. खा. संजयकाका पाटील यांनी, विक्रमसिंह पाटील यांच्या पत्नी सोनाली व रणजितसिंह पाटील यांना उमेदवारी देत नातेवाईकांची सोय केली आहे. राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते व त्यांच्या पत्नी सविता मोहिते, नगरसेवक धनपाल खोत व त्यांचे पुत्र महावीर, नगरसेवक महेंद्र सावंत व त्यांच्या भावजय स्नेहल सावंत अशा कुटुंबातीलच जोड्याही मैदानात आहेत.
कुटुंबावर निष्ठा
सर्वच राजकीय पक्षांकडून प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवकांनी स्वत:च्या कुटुंबावर निष्ठा दाखवित कुटुंबाच्या नव्या पिढीला पुढे चाल दिल्याचे दिसून येते. नगरसेविका शालन चव्हाण यांचे पुत्र व युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनाही काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. नगरसेवक आयुब पठाण यांचे बंधू फिरोज, नगरसेविका शंकुतला भोसले यांचे पुत्र अभिजित, प्रशांत पाटील यांच्या पत्नी पद्मश्री, नगरसेवक जुबेर चौधरी यांच्या आई यास्मिन, भाजपकडून माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्य यांना तिकीट मिळवून देण्यात हे कुटुंबीय यशस्वी ठरले आहेत.