अवकाळीच्या नुकसानीची भरपाई द्यावी
By admin | Published: December 14, 2014 10:43 PM2014-12-14T22:43:41+5:302014-12-15T00:00:41+5:30
जयंत पाटील : अधिवेशनात याप्रश्नी आवाज उठविणार
इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी तासगाव तालुक्यातील विसापूर गावाला भेट देऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्षबागा, शाळू, हरभरा, मका व ऊस पिकांची पाहणी केली़
शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून द्राक्ष बागायत शेतक-यांना एकरी २ लाख तसेच शाळू, हरभरा, मका व ऊस पीक उत्पादक शेतकऱ्यांनाही भरीव नुकसानभरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली़ आम्ही हा विषय अधिवेशनात प्रभावीपणे मांडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़ यावेळी शेतकऱ्यांनी गावाची आणेवारी चुकीची झाल्याचे आ़ पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून फेरआणेवारी तातडीने करावी, अशी सूचना केली.
आ़ पाटील यांनी रविवारी दुपारी विसापूर येथील बापूसाहेब माने, शिवाजी माळी, अनिल माने यांच्या द्राक्षबागा, बाळासाहेब माने, भीमराव मंडले यांचे शाळू पीक, तर संपतराव माने यांच्या ऊस पिकाची पाहणी केली़ यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीच्या सभागृहात शेतकरी व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली़ प्रारंभी माजी सभापती सुनील पाटील म्हणाले, १२ डिसेंबरला आमच्या गावात वादळी वारा, गारासह अवकळी ८६ मिलिमीटर पाऊस झाला़ या पावसामध्ये आमच्या अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांसह शाळू, हरभरा, मका व ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे़ शासनाने आमच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून आम्हास नुकसानभरपाई द्यावी. एका शेतकऱ्याने माझी बाग निर्यातीसाठी २0 लाख रुपयांना दिली आहे़ ती १४ तारखेस तोडली जाणार होती; मात्र १२ तारखेलाच पाऊस होऊन बागेचे नुकसान झाल्याचे सांगितले़ कृषी अधिकारी शिंदे म्हणाले, आता उभ्या असलेल्या द्राक्ष बागातील द्राक्षे चिरली असून, दावण्या अळीने ८ ते १0 दिवसात द्राक्षांचे घड गळून पडू शकतात़
आ़ पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे़ आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये या नुकसानीची तीव्रता शासनाच्या निदर्शनास आणून देऊ़ शासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देऊ़ याप्रसंगी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष शंकरदादा पाटील, माजी सभापती पतंगबापू माने, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, माजी सभापती शैलेंद्र सूर्यवंशी, सरपंच सौ़ मंगल शिवणकर, उपसरपंच चव्हाण, तलाठी तसेच शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)