वाळवा तालुक्यातील बाह्य रुग्णांची दैनंदिन माहिती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:27 AM2021-05-21T04:27:15+5:302021-05-21T04:27:15+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुक्यात कोरोनाच्या दुुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी स्थानिक पातळीवरच सर्दी, ताप, श्वसन, फुफ्फुसाचे आजार व इतर कोविडसदृश्य लक्षणे ...
इस्लामपूर : वाळवा तालुक्यात कोरोनाच्या दुुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी स्थानिक पातळीवरच सर्दी, ताप, श्वसन, फुफ्फुसाचे आजार व इतर कोविडसदृश्य लक्षणे असलेल्या संशयित बाह्य रुग्णांची माहिती संकलित केली जात आहे. त्यानंतर अशा संशयित रुग्णांची कोविड टेस्ट करून त्यांच्यावर वेळीच उपचार करत जीवितहानी रोखण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी अशा रुग्णांची माहिती दररोज द्यावी, असे आवाहन गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले अहे.
शिंदे म्हणाले, शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना साथ रोगाची दुसरी लाट फैलावत आहे. या आजारावर तातडीने उपचार करण्यासाठी तालुकास्तरावर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून जिल्हा परिषदेतील पाणी व स्वच्छता कक्ष आणि ग्रामीण विकास यंत्रणेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून बाह्य रुग्णांची दैनंदिन माहिती घेतली जात आहे. या प्रक्रियेचे नियंत्रण तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केले जात आहे.
ते म्हणाले, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होणारी जीवित हानी टाळण्यासाठी ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या बाह्य रुग्णांची माहिती गुगल लिंकवर दिलेल्या स्प्रेडशिटवर द्यायची आहे. अशा रुग्णांची माहिती लपविल्यास किंवा ती देण्यास टाळाटाळ केली, त्यातून अशा रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास संबंधित डॉक्टरांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय साथ रोग अधिनियम १८९७ अन्वये कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी प्रशासनास सहकार्य करावे.