मागेल तेथे चारा छावण्या द्या
By admin | Published: March 21, 2016 12:37 AM2016-03-21T00:37:03+5:302016-03-21T00:38:08+5:30
चंद्रकांत पाटील : तालुक्यात दोन दिवसात दुष्काळ जाहीर करणार
आटपाडी : मागे चारा छावण्या हा काहींचा व्यवसाय झाला होता. पण अधिकाऱ्यांनी आवश्यकता पाहून, पडताळणी करून मागेल तिथे चारा छावणी द्यावी. आटपाडी तालुक्यातील रब्बी हंगामाची आणेवारी कमी असल्याने दोन दिवसात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करू. कोणत्याही परिस्थितीत हे सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभे आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.
येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आटपाडी तालुका टंचाई आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘जलयुक्त शिवार’ या योजनेच्या माध्यमातून ५ वर्षांत ३३ हजार गावे पूर्ण करणार आहे. अधिकाऱ्यांनी या कामांमध्ये भ्रष्टाचार न करता पुण्याईचे काम म्हणून काम केले पाहिजे. मंदिराच्या पैशात भ्रष्टाचार करावा, असं जसं पुजाऱ्याला वाटणार नाही, तितक्या पवित्रतेने दुष्काळ हटविण्यासाठी अधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार योजनेची कामे करावीत. ती कामे निकृष्ट करू नयेत. या योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही. वर्षभरात १४०० कोटींची कामे झाली. या कामांमध्ये १४ हजार कोटी खर्चून धरणे बांधली असती. त्यापेक्षा मोठं काम झालं. खासगी कंपन्यांकडूनही निधी उपलब्ध करून या योजनेला देत आहोत.
आमदार अनिल बाबर म्हणाले, सध्या चारा टंचाई आहे. ३१ मार्चपासून जनावरांसाठी छावण्या सुरू करा. टेंभू योजनेच्या पाण्यामुळे तालुक्यात टँकर कमी आहेत, ही अवस्था आहे. आम्ही फुकट पाणी अजिबात मागणार नाही. हा हत्ती आहे, एकदा बसला की पुन्हा तो उठणार नाही. पण या भागात १५ आॅगस्टनंतर पाऊस येतो.
टेंभू योजनेच्या पाण्याचे ४ महिन्यांचे नियोजन झाले पाहिजे. त्यात दुष्काळी परिस्थितीत महाराष्ट्र कर्नाटकला किंवा कर्नाटक महाराष्ट्राला पाणी देतो, तसे योजनेच्या लाभक्षेत्रात भाग आहे का नाही, हे अधिकाऱ्यांनी पाहू नये, अशा सूचना कराव्यात. पक्षभेद न करता आम्ही पाणीपट्टीची वसुली करू, पण शेतकऱ्यांना टेंभू योजनेची ५ आवर्तने देण्याची व्यवस्था करावी. वर्षातून एकदा शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी घ्या.
यावेळी रावसाहेब पाटील यांनी, कचरे वस्ती तलावातून पाणी सोडावे, अशी मागणी केली. बंडोपंत देशमुख, महिपती पवार, आटपाडीच्या सरपंच सौ. स्वाती सागर यांनी, टंचाई परिस्थितीवर उपाययोजना करण्याबाबत मागण्या केल्या. प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर, तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी सौ. मीना साळुंखे, सभापती सौ. सुमन देशमुख, उपसभापती भागवत माळी उपस्थित होते. (वार्ताहर)