कडेगाव तालुक्यात पूर्ण क्षमतेने व अखंडित वीज द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:33 AM2021-09-09T04:33:05+5:302021-09-09T04:33:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : कडेगाव तालुक्यातील खरीप पिके, ऊस, भाजीपाला-फळभाज्या आणि विविध फळबागा सध्या पाणी देण्याच्या अवस्थेत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील खरीप पिके, ऊस, भाजीपाला-फळभाज्या आणि विविध फळबागा सध्या पाणी देण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र, पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वीजटंचाईने त्रस्त शेतकऱ्यांनी काही ठिकाणी आंदोलनेही केली आहेत. यावर आता तत्काळ उपाययोजना करा आणि आठ तास अखंडित वीजपुरवठा करा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना दिल्या.
‘महावितरण’च्या विटा विभागीय कार्यालयात देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह भेट देऊन कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांच्याशी शेतीपंपांच्या वीजप्रश्नी चर्चा केली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धनंजय देशमुख, संपतराव देशमुख मिल्क युनियनचे संचालक संदेश दंडवते, सुधाकर चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी संग्रामसिंह देशमुख म्हणाले राज्य सरकारने शेतीपंपासाठी सलग आठ तासही वीज मिळत नाही. रात्री-बेरात्री उठावे लागत आहे. तांत्रिक अडचणी असल्याचे कारण सांगत वीजपुरवठा खंडित केला जातो. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. कडेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी रोहित्र कमी क्षमतेचे आहेत. योग्य दाबाने वीज मिळत नाही. विजेच्या लपंडावाने विद्युत पंप जळण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर तत्काळ उपाययोजना होणे गरजेचे आहे, असे सांगितले.
यावेळी वसंतराव शिंदे, संभाजी रासकर, प्रकाश गायकवाड, अरुण हावलदार, बबन माळी, सुधाकर शेटे, हणमंत चव्हाण, मनोज माळी, प्रवीण सूर्यवंशी उपस्थित होते.
चौकट :
शेतीपंपाच्या वीजप्रश्नी पालकमंत्र्यांना भेटणार :
कडेगाव तालुक्यात वीज वितरण कंपनीची यंत्रणा सक्षमपणे उभा करण्याची गरज आहे. तालुक्यात वीज उपकेंद्रांची संख्या वाढवण्याची गरज आहे. वीज वितरण कंपनीने तालुक्याचा सर्वसाधारण आराखडा तयार करावा. प्रसंगी आम्ही स्वतः पालकमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मागणी करणार आहोत, असेही संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले.