सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 06:25 PM2019-01-29T18:25:48+5:302019-01-29T18:29:18+5:30
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोरगरीबांच्या कल्याणासाठी झटणारे आहेत. सामान्य माणूस आरोग्य संपन्न राहीला तर त्याचे संपूर्ण कुटूंब सुखी व सुदृढ रहाते म्हणून सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याची सर्वोतोपरी दक्षता घेण्यात येत आहे, असे सांगून सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत उभारण्यात येत असलेल्या सर्व रूग्णांलयामधून सर्वसामान्य गोरगरीबांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
सांगली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोरगरीबांच्या कल्याणासाठी झटणारे आहेत. सामान्य माणूस आरोग्य संपन्न राहीला तर त्याचे संपूर्ण कुटूंब सुखी व सुदृढ रहाते म्हणून सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याची सर्वोतोपरी दक्षता घेण्यात येत आहे, असे सांगून सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत उभारण्यात येत असलेल्या सर्व रूग्णांलयामधून सर्वसामान्य गोरगरीबांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी नवीन 10 प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामासाठी निधी उपलब्ध होवून 50 हजार लोकसंख्येकरिता एक या प्रमाणे 10 प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येत आहेत. यातील विश्रामबाग सांगली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, महानगरपालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर, उपमहापौर धीरज सुर्यवंशी, उपायुक्त स्मृती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आजारपणामध्ये रूग्णांना डॉक्टरांचा खूप मोठा आधार असतो. त्यामुळे रूग्णांशी आपुलकीने संवाद साधा. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे याची जाणीव ठेवून त्यांना सेवा द्या असे सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, आजारपणामध्ये उपचार करण्याबरोबरच माणसे आजारीच पडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपायांबाबत जनजागृतीही करा. आयुष्यमान भारत या योजनेंतर्गत देशातील प्रत्येक गोरगरीबाला 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधूनही खूप मोठ्या प्रमाणावर गरजूंना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व योजनांचा गरजूंना लाभ मिळवून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
खासदार संजय पाटील म्हणाले, केंद्र शासनाने महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी 10 कोटी रूपये उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे या क्षेत्रातील गोरगरीबांच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रानी सांगली सिव्हील हॉस्पीटलचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून रूग्णांना सेवा द्यावी.
महापौर संगीता खोत यांनी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत उभारण्यात येत असलेल्या 10 पैकी 8 प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत 2 आरोग्य केंद्रांचे कामही लवकरच पूर्ण होईल असे सांगून या सर्व आरोग्य केंद्रामधून परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील असा विश्वास व्यक्त केला.
शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत नागरिकांना मोफत बाह्यरूग्ण सेवा, बाह्यसंपर्क आरोग्य शिबीर, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा, संदर्भ सेवा, गरोदर माता व 0 ते 5 वयोगटातील बालकांची तपासणी व औषधोपचार, साथरोग सर्व्हेक्षण व उपचार, सामान्य प्रयोगशाळा तपासणी सुविधा, किरकोळ औषधोपचार, कुटूंब कल्याण शस्त्रक्रीया मार्गदर्शन व सल्ला, कुटूंब नियोजन पध्दती मार्गदर्शन, पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, नियमित लसीकरण कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, जिवनसत्व अ व जंतनाशक मोहीम, कुटूंब कल्याण कार्यक्रम, आरोग्य विषयक सल्ला केंद्र, किशोरवयीन मुलामुलींना सल्ला व मार्गदर्शन, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आदि सेवा सुविधा उपलब्ध होणार आहेत.
प्रास्ताविक उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले. आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी मनोगत व्यक्त केले. आभार संजय कुलकर्णी यांनी मानले. यावेळी महानगरपालिकेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.