महापालिका क्षेत्रातील रस्त्यांसाठी १३० कोटींचा निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:29 AM2021-09-27T04:29:11+5:302021-09-27T04:29:11+5:30
सांगली : महापूर, अतिवृष्टीमुळे महापालिका क्षेत्रातील रस्ते खराब होत आहेत. मजबूत व टिकाऊ रस्त्यांसाठी काँक्रिटीकरण हाच पर्याय असून, त्यासाठी ...
सांगली : महापूर, अतिवृष्टीमुळे महापालिका क्षेत्रातील रस्ते खराब होत आहेत. मजबूत व टिकाऊ रस्त्यांसाठी काँक्रिटीकरण हाच पर्याय असून, त्यासाठी केंद्र शासनाकडून १३० कोटींचा निधी मिळावा, असे साकडे स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना घातले. शहरातील रस्त्यासाठी १०० कोटी, तर शंभरफुटी रस्त्यासाठी ३० कोटींची मागणीही त्यांनी केली.
कऱ्हाड येथील कार्यक्रमात आवटी यांनी मंत्री गडकरी यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे नेते सुरेश आवटी, स्थायीचे माजी सभापती संदीप आवटी उपस्थित होते. आवटी म्हणाले की, महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची लांबी ६२० किलोमीटर आहे. महापूर व अतिवृष्टीमुळे शहरातील रस्ते खराब होत आहेत. हे रस्ते मजबूत व टिकाऊ होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. सिमेंट काँक्रीटचे रस्ते केल्यास ते टिकाऊ होतील. काँक्रीट रस्ते करताना भूमिगत वाहिन्या, फुटपाथ, गटारी, आदींचे नियोजनही आवश्यक आहे. त्यानुसार महापालिकेने एक किलोमीटर लांबी व १२.२० मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी पाच कोटी २२ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे.
सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. कोरोना व महापुरामुळे कर वसुलीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांसाठी केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन १३० कोटींच्या निधीची मागणी केली आहे.
चौकट
शंभर फुटीसाठी ३० कोटींची गरज
सांगलीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शंभर फुटी रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्याची लांबीची चार किलोमीटर आहे. सध्या रस्ता डांबरी असला तरी तो खराब झाला आहे. या रस्त्यावरून अवजड वाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी २८ कोटी ६६ लाख रुपयांची गरज आहे. हा निधीही केंद्राने मंजूर करावा, अशी मागणी मंत्री गडकरी यांच्याकडे केल्याचे आवटी यांनी सांगितले.