सांगलीत दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी, पशुधनासाठी चाऱ्याची सोय करा; जनता दलाची मागणी
By अशोक डोंबाळे | Published: May 18, 2024 06:17 PM2024-05-18T18:17:01+5:302024-05-18T18:17:36+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना दिले मागण्यांचे निवेदन
सांगली : जिल्ह्यात प्रचंड पाणीटंचाई असून पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पशुधनासाठी चारा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना सुरू ठेवून पाझर तलाव भरून घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जनता दलातर्फे देण्यात आला आहे. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, मान्सूनचा पाऊस सुरू होण्यासाठी अद्याप महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे चारा, पाण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत. तसेच ताकारी, टेंभू, म्हैसाळ जलसिंचन योजनेतून जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जलसाठे भरून घ्यावेत, तसेच गरज असेल तेथे टँकरने पाणीपुरवठा करावा. वीजबिलात केलेली भरमसाठ वाढ तत्काळ मागे घेण्याची गरज आहे. महावितरणने सक्तीची अनामत रक्कम रद्द करावी, आदी मागण्यांचे निवेदन जनता दलाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.
यावेळी प्रणव पाटील, सुमित पाटील, जयपाल चौगुले, जनार्दन गोंधळी, विजय कुदळे, साहेबुद्दीन मुजावर आदी उपस्थित होते.
चारा डेपो, चारा छावण्या सुरू करा
अपुऱ्या पावसामुळे चाराटंचाई निर्माण झाली आहे. पाणी व चाऱ्याच्या समस्येमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये प्रशासनाने तातडीने चारा डेपो, चारा छावण्या सुरू कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली. मनरेगाच्या कामातून जनतेला रोजगार उपलब्ध करून द्यावा, या मागण्यांवर आठ दिवसांत निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रणव पाटील यांनी दिला आहे.