वायुसेनेतील करिअरसाठी तरतूद करणार
By admin | Published: October 17, 2016 12:41 AM2016-10-17T00:41:19+5:302016-10-17T00:41:19+5:30
चंद्रकांत पाटील : सांगलीत ‘करिअर संधी’ मार्गदर्शन शिबिर
सांगली : जिल्ह्यातील सैन्यदलात विशेषत: वायुदलात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच निधीची तरतूद करण्यात येणार आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या विद्यार्थ्यांना पुस्तके, संगणक बाबींची तरतूद जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगलीत केले.
वायुसेना, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आणि सांगली शिक्षण संस्था यांच्यावतीने आयोजित ‘भारतीय वायु सेनेमधील करिअर संधी’ या मार्गदर्शन शिबिरात पाटील बोलत होते. पाटील म्हणाले की, वायुसेनेमधील अधिकारी पदाच्या करिअर संधी व निवड प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने अभियान राबविले जात आहे.
या अभियानाचा भाग म्हणून निवड प्रक्रिया प्रसार व प्रदर्शन वाहन तयार केले आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांना होईल. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतूनही यासाठी तरतूद करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी आ. सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले (निवृत्त), सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रणजितसिंह सूर्यवंशी, कर्नल डी. एम. रानडे (निवृत्त), विंग कमांडर ए. एस. जोसेफ, फ्लाईट लेफ्टनंट दीपिका खजुरिया, फ्लाईट लेफ्टनंट प्रदीप, फ्लार्इंग आॅफिसर असीम गर्ग आदी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सैनिकांच्या वारसांचा सन्मान
सेवा बजावत असताना मृत्यू झालेल्या सैनिकांच्या वारसांना आर्थिक मदतीचे वाटप पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यात संगीता पाटील (डफळापूर), वर्षा चौगुले (कुपवाड), चंद्रभागा पोळ (शाळगाव) यांना धनादेश देण्यात आले. राजू धोंडिराम साळुंखे (डोंगरसोनी) यांना सेवा बजावताना अपंगत्व आल्यामुळे त्यांना ताम्रपट पुरस्कार देण्यात आला.