राजारामबापू दूध संघात प्रांतीय वाद, संचालिका उज्ज्वला पाटील राष्ट्रवादीतून बाहेर पडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 01:59 PM2022-01-21T13:59:37+5:302022-01-21T14:01:10+5:30
राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी नुकत्याच झाल्या. हे दोन्ही पदाधिकारी विधानसभेच्या शिराळा मतदारसंघातील आहेत.
अशोक पाटील
इस्लामपूर : राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी नुकत्याच झाल्या. हे दोन्ही पदाधिकारी विधानसभेच्या शिराळा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघातील जयंत पाटील समर्थकांतून नाराजीचा सूर आहे. नूतन संचालिका उज्ज्वला पाटील (आष्टा) यांना अध्यक्षपद न मिळाल्याने त्या पक्षातून बाहेर पडणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील इस्लामपूर, शिराळा मतदारसंघातील सर्वच सहकारी संस्था सक्षम आहेत. त्यातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याची तीन युनिट, दूध संघ, शैक्षणिक संस्था, बँक या संस्थांवर संचालक म्हणून वर्णी लागण्यासाठी कार्यकर्त्यांची रस्सीखेच असते.
जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू दूध संघाच्या नूतन संचालक निवडी बिनविरोध झाल्या. अध्यक्षपदी नुकतीच नेताजीराव पाटील (तांबवे), शशिकांत पाटील (ठाणापुडे) यांची वर्णी लागली. ही गावे वाळवा तालुक्यातील असली तरी विधानसभेच्या शिराळा मतदारसंघात येतात. त्यामुळे विधानसभेच्या इस्लामपूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांत, विशेषत: माजी अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या गटात नाराजी आहे. कारण अध्यक्षपदासाठी नेताजी पाटील, शशिकांत पाटील, संग्राम फडतरे (आष्टा), उज्ज्वला पाटील (आष्टा), बाळासाहेब पाटील (इस्लामपूर) यांनी मोर्चेबांधणी केली होती.
या निवडीसाठी दूध संघाच्या कार्यस्थळावर १९ जानेवारीरोजी संचालकांची बैठक झाली. यामध्ये नेताजीराव पाटील आणि शशिकांत पाटील यांची निवड होताच नूतन संचालिका उज्ज्वला पाटील यांनी बैठकीमधून तडकाफडकी बाहेर पडून नाराजी व्यक्त केली. आता त्या पक्षातून बाहेर पडणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. याबाबत आता जयंत पाटील काय निर्णय घेतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दूध संघावर संचालिका म्हणून गेली दहा वर्षे कार्यरत आहेत. यावेळी संचालकपद देण्यात आले. आष्टा परिसरात आमच्या दूध संस्था सक्षम आहेत. आम्ही पहिल्यापासून जयंत पाटील गटाचे निष्ठावंत आहोत. अध्यक्षपदासाठी पाटील यांच्याकडे लेखी अर्ज केला होता; परंतु विचार केला गेला नाही. त्यामुुळे नाराज आहोत. - उज्ज्वला पाटील, संचालिका, राजारामबापू दूध संघ.