पं. स. सभापती पदासाठी इच्छुकांचे लॉबिंग

By Admin | Published: March 9, 2017 11:20 PM2017-03-09T23:20:13+5:302017-03-09T23:20:13+5:30

विशेष सभेत १४ मार्चरोजी निवडी : जत, मिरज पंचायत समितीवर भाजपला काठावरचे बहुमत

Pt C. Lobbying aspirant for the post of Chairman | पं. स. सभापती पदासाठी इच्छुकांचे लॉबिंग

पं. स. सभापती पदासाठी इच्छुकांचे लॉबिंग

googlenewsNext



सांगली : जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांपैकी पलूस, कडेगाव, आटपाडीमध्ये स्पष्ट, तर मिरज, जत पंचायत समितीत भाजपला काठावरचे बहुमत मिळाले आहे. खानापुरात शिवसेना, तर शिराळ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संयुक्त सत्ता आणि वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत आहे. येथील सभापती, उपसभापतींच्या निवडी दि. १४ मार्चरोजी होणार आहेत. सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी सभापती, उपसभापतीपदे पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार लॉबिंग चालू केले आहे.
शिराळा पंचायत समितीत दोन्ही काँग्रेस आघाडीची सत्ता असून, आठपैकी सात जागा मिळाल्या आहेत. अनुसूचित जाती महिलांसाठी सभापतीपद आरक्षित असल्यामुळे मांगले गणातील मायावती रामचंद्र कांबळे यांची सभापतीपदी वर्णी लागणार आहे. उपसभापतीपदी सम्राटसिंह नाईक, बाळासाहेब नायकवडी यांची नावे चर्चेत आहेत.
आटपाडी पंचायत समितीत भाजपला स्पष्ट बहुमत असल्यामुळे सभापतीपदी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे पुत्र हर्षवर्धन देशमुख यांची वर्णी लागणार, हे निश्चित झाले आहे. उपसभापतीपद गोपीचंद पडळकर गटाला मिळणार असून, तानाजी यमगर प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
कडेगाव पंचायत समितीतही भाजपला स्पष्ट बहुमत असल्यामुळे येथे प्रथमच कमळ फुलणार आहे. सभापती पद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असून, मंदाताई करांडे आणि उपसभापतीपदी रवींद्र कांबळे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
पलूस पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे नागठाणे गणातील सीमा प्रकाश मांगलेकर यांची सभापतीपदी वर्णी लागणार आहे. उपसभापतीपदी दीपक मोहिते (रामानंदनगर) आणि राष्ट्रवादीचे अरुण पवार (कुंडल) यांच्या नावाची सध्या चर्चा चालू आहे.
मिरज पंचायत समितीत भाजपला काटावरचे बहुमत मिळाले आहे. येथील सभापती आणि उपसभापती निवडीवेळी भाजप आणि काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे. सभापतीपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित असल्यामुळे एरंडोली, सलगरे व कवलापूर गणातील उमेदवारास सभापती पदाची लॉटरी लागणार आहे. भाजपला २२ पैकी ११ जागा मिळाल्यामुळे त्यांच्याकडे काठावरचे बहुमत असल्यामुळे त्यांनी सत्ता स्थापण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. खटाव पंचायत समिती गणातून विजयी झालेल्या जनाबाई पाटील या एकमेव ओबीसी सदस्य भाजपकडे आहेत. त्यामुळे त्यांची निवडही आता निश्चित समजली जात आहे.
कवठेमहांकाळ पंचायत समितीत राष्ट्रवादी आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे वर्चस्व आहे. सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे मनोहर पाटील (देशिंग गण), मदन पाटील (कुची गण) आणि उपसभापती पदासाठी जोत्स्ना माळी (नागज गण) यांच्या नावाची चर्चा आहे. खानापूर पंचायत समिती सभापती पदासाठी शिवसेनेचे स्पष्ट बहुमत आहे. कविता देवकर (गार्डी)आणि मनीषा बागल (लेंगरे) यांची नावे चर्चेत आहेत.
तासगाव पंचायत समितीचे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित असून वासुंबे गणातील माया एडके आणि सावळज गणातील मनीषा माळी सभापती पदासाठी इच्छुक आहेत. उपसभापती पदासाठी बोरगाव गणातील संभाजी पाटील आणि मणेराजुरी गणातील संजय जमदाडे यांच्या नावाची चर्चा आहे. इच्छुकांनी आतापासूनच पदांसाठी नेत्यांकडे फिल्डिंग लावली असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pt C. Lobbying aspirant for the post of Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.