corona virus-शोले स्टाईल दुचाकीवरून करोनाबाबत जनजागृती, दीपक चव्हाण यांचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:52 AM2020-03-18T11:52:46+5:302020-03-18T11:55:47+5:30
करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी आजपासून आपल्या शोले स्टाईल दुचाकीवरून जनजागृती सुरू केली आहे.
सांगली : करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी आजपासून आपल्या शोले स्टाईल दुचाकीवरून जनजागृती सुरू केली आहे.
आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या उपस्थितीत दीपक चव्हाण यांनी आपल्या शोले दुचाकीचा करोना जनजागृती शुभारंभ केला. या शोले दुचाकीवर गब्बर सिंग, जय, बसंती, बिरू यांच्या प्रतिकृती करोनाबाबत संदेश देत आहेत. याचबरोबर जिल्हा प्रशासनाचा करोनाबाबतचा जनजागृती संदेशही याव्दारे देण्यात आला आहे.
करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत शोले स्टाईल दुचाकीवरून सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी सुरू केलेली जनजागृती अत्यंत स्तुत्य असून सर्व नागरिकांनी याला भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
दीपक चव्हाण यांनी यापूर्वीही अनेक आपत्ती तसेच शासनाच्या योजनांचे शोलेस्टाईल प्रबोधन आणि जनजागृती केली आहे. आता दीपक चव्हाण यांनी करोना विषाणूपासून जनतेने कसे दूर राहायचे तसेच काय काळजी घ्यावी याबाबतची प्रबोधन आपल्या शोले दुचाकीवरून सुरू केले आहे.
दीपक चव्हाण यांचे हे 36 वे प्रबोधन आहे. दीपक चव्हाण यांच्या या उपक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी शुभेच्छा दिल्या.
सांगली शहरात दीपक चव्हाण यांचा करोना जनजागृती शोले स्टाईल रथ प्रबोधन करत फिरणार आहे. विशेष म्हणजे दीपक चव्हाण यांनी चित्रपटाच्या चालीवर करोना प्रबोधन गीतही तयार केले असून ते गीत सोशल मीडियावर लोकप्रिय बनले आहे.