भाजपला सत्तेवरून खाली खेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:20 PM2018-10-23T23:20:42+5:302018-10-23T23:20:46+5:30
पलूस : भाजप सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरत आहे. ते सामान्यांचे नसून, धनदांडग्यांचे आहे. त्यांना सत्तेतून खाली खेचणे आवश्यक ...
पलूस : भाजप सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरत आहे. ते सामान्यांचे नसून, धनदांडग्यांचे आहे. त्यांना सत्तेतून खाली खेचणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अरुणअण्णा लाड यांनी व्यक्त केले. पलूस येथे सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठीच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने काढलेल्या मोर्चामध्ये ते बोलत होते.
ते म्हणाले, इंधनाचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याने कुटुंबाचा कणाच मोडला आहे. गृहिणींना घरातील मासिक ताळेबंद सावरताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हीच परिस्थिती शेतीच्याबाबतीतही आहे. एकीकडे शासन शेतीसाठी शाश्वत धोरण राबवू असे म्हणते आणि दुसरीकडे खतांच्या किमती वाढवून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. विजेची चोरी ही सर्वतोपरी शेतकºयांच्या माथी मारली जात आहे. शासनाची कर्जमाफी शेतकºयांसाठी नसून, बँकांची वसुली होण्यासाठी केली होती, असे चित्र आहे.
शासनाचा नोटाबंदीचा निर्णयही फसला आहे. एकीकडे शासन म्हणते वीज मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि दुसरीकडे या दिवसातही शेतकºयांना भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. अन्न सुरक्षा कायद्याखाली सामान्य लोकांना रेशन दुकानातून स्वस्त धान्य बंद करण्याचा डाव आहे. सामान्यांना खायला अन्न लागते, पैसा नाही, हे शासन विसरत आहे. एकंदरीत शेती आणि शेतीपूरक व्यवसाय पूर्णत: अडचणीत आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार राजेंद्र पोळ यांना दिले आहे. याबाबत काही निर्णय झाला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध केला.
जि. प. सदस्य शरद लाड, नंदाताई पाटील, अरुण जाधव, पूजा लाड, पं. स. उपसभापती अरुण पवार, मंगल भंडारे, पक्षनिरीक्षक विश्वास पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष भरत देशमुख, सुरेश चव्हाण, तानाजी मोकाशी, पोपट संकपाळ, राजाराम पाटील (बुर्ली), मारुती चव्हाण, दिलीप पाटील, ज्ञानेश पाटील, कुंडलच्या सरपंच प्रमिला पुजारी यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, महिला यावेळी उपस्थित होत्या.