डाळी कडाडलेल्याच!
By Admin | Published: August 18, 2016 11:34 PM2016-08-18T23:34:16+5:302016-08-18T23:34:19+5:30
‘बजेट’ कोलमडले : घाऊक दरात घट, किरकोळ बाजारात दर ‘जैसे थे’च
शीतल पाटील - सांगली --गगनाला भिडलेल्या डाळींच्या किमती आता पाऊसमान चांगले झाल्याने घाऊक (होलसेल) बाजारपेठेत उतरू लागल्या आहेत. गेल्या महिन्याभरात डाळींच्या किमतीत २० ते २५ रुपयांनी घट झाली आहे. मात्र किरकोळ (रिटेल) बाजारात डाळींचे दर कडाडलेलेच आहेत. अजूनही तूरडाळ १६० रुपये किलोनेच विक्री केली जात आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या ‘किचन’चे ‘बजेट’ कोलमडले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात दरवर्षी सरासरीइतका पाऊस पडत असला तरी, शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे ओढा वाढला आहे. त्याचा परिणाम डाळींच्या उत्पादनावर झाला आहे. पूर्वीच्या काळी घरापुरते का होईना, डाळींचे उत्पादन घेतले जात होते. आता बदलती जीवनशैली आणि ‘रेडी टू कुक’ पद्धतीमुळे बाजारपेठेतून धान्य, डाळी खरेदीकडे कल वाढला आहे.
सांगलीच्या मार्केट यार्डात वर्षाच्या सुरुवातीलाच डाळींचे दर कडाडले. घाऊक बाजारात (होलसेल) तूरडाळ ११० ते ११५ रुपयांच्या घरात पोहोचली. व्यापाऱ्यांकडून डाळ खरेदी करून किरकोळ दुकानांद्वारे ती ग्राहकाला मिळेपर्यंत तिचा दर १६० रुपयांपर्यंत गेला. केवळ तूरडाळच नव्हे, तर मूगडाळ, हरभराडाळ व मसूरडाळीच्या किमतीही वाढल्या. अगदी महिन्याभरापूर्वी घाऊक बाजारात तूरडाळ ११० ते ११५ रुपये किलो दराने विक्री होत होती. हरभराडाळीचे दरही महिन्याभरापूर्वी ११० रुपयांपर्यंत होते, पण जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली. राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. त्यामुळे घाऊक खरेदी करणाऱ्या मिल मालकांना यंदा बाजारात डाळींच्या उत्पादन वाढीचा अंदाज आला. साठा करून ठेवलेली डाळ आता बाजारपेठेत येऊ लागली आहे. परिणामत: घाऊक बाजारात डाळींचे दर उतरण्यास सुरुवात झाली आहे.
तूरडाळ व मूगडाळीचे दर २० ते २५ रुपयांनी उतरले असले तरी, हरभराडाळीचे दर मात्र कडाडले आहेत. चार महिन्यांपूर्वी ५५ ते ६० रुपये किलो दराने हरभराडाळ विक्री होत होती. सध्या तिचा दर ९० ते ९५ च्या घरात पोहोचला आहे. सणासुदीच्या दिवसांचा हा परिणाम आहे.
घाऊक बाजारात डाळींच्या दरात घसरण झाली असली तरी, किरकोळ बाजारात मात्र आजही चढ्या दरानेच डाळींची विक्री होत आहे. तूरडाळ ११० ते १६०, मूगडाळ ८० ते ९०, मसूरडाळ ८० ते ८५ व हरभराडाळ १०५ ते १६० रुपये दराने विक्री होत आहे.
लातूरमधून सर्वाधिक डाळीची आवक
सांगलीच्या वसंतदादा मार्केट यार्डात मुख्यत: मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांतून डाळी येतात. लातूर जिल्ह्यातून सर्वाधिक डाळीची आवक होते. शिवाय मुंबईतून परदेशातून आयात केलेल्याही डाळी येतात. याव्यतिरिक्त मध्य प्रदेशातील इंदूरहून चणाडाळ, राजस्थानहून मूगडाळ, जळगावमधून मटकीची सांगलीत आवक होते. शासनाने डाळींचा साठा करण्यावरही व्यापाऱ्यांना बंधने घातली आहेत. एका व्यापाऱ्याला सर्व डाळींचा मिळून ३५०० क्विंटल इतकाच साठा करता येतो. सांगलीच्या बाजारपेठेत इतका डाळीचा साठा कोणीच ठेवत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
शिधापत्रिकेवर १०३ रुपये तूरडाळ
जिल्ह्यात शिधापत्रिकेवर मात्र तूरडाळीचा दर १०३ रुपये इतका आहे. घाऊक बाजारात तूरडाळीचा दर ९० ते ९२ रुपये इतका असला तरी, किरकोळ दुकानात याच डाळीचा दर १२० ते १३० रुपयांच्या घरात आहे. जिल्ह्यात अंत्योदय कार्डधारकांची संख्या ३५ हजार ६०५, तर दारिद्र्यरेषेखालील कार्डधारकांची संख्या ५९ हजार आहे. एका कार्डधारकाला एक किलो तूरडाळ दिली जाते. जिल्ह्यासाठी दरमहा एक हजार क्विंटल तूरडाळ लागते.
जुलैअखेरपर्यंत डाळींच्या किमती वाढल्या होत्या. वर्षभरात दरात चढ-उतार होत आहे. पावसाच्या आगमनावर डाळींच्या किमती अवलंबून आहेत. जुलै महिन्यात सर्वत्र पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे भविष्यात डाळींचे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम त्यांच्या किमतीवर होत असून, सध्या घाऊक बाजारात डाळींचे दर कमी झाले आहेत. - सुरेश हिडदुगी, व्यापारी