पलूस कॉलनीत रंगला अनोखा स्नेहमेळावा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:07 PM2018-10-15T23:07:32+5:302018-10-15T23:09:30+5:30
येथील पलूस कॉलनीतील आजी-माजी रहिवाशांनी एकत्र येत अनोखा स्नेहमेळावा साजरा केला. यानिमित्ताने अनेकांनी बालपणीच्या, उमेदीच्या काळातील स्मृतींना यावेळी
पलूस : येथील पलूस कॉलनीतील आजी-माजी रहिवाशांनी एकत्र येत अनोखा स्नेहमेळावा साजरा केला. यानिमित्ताने अनेकांनी बालपणीच्या, उमेदीच्या काळातील स्मृतींना यावेळी उजाळा दिला.
पलूस कॉलनी हे गाव १९६४ मध्ये किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीच्या सेवक वर्गासाठी महाराष्ट्र हौसिंग बोर्डाच्या सहकार्याने वसवले गेले. बरोबर १०० कुटुंबांचे हे गाव. पुढे येथील अनेक कुटुंबे शिक्षण, नोकरी, निवृत्ती अशा विविध कारणांनी कॉलनीतून बाहेर पडली. परंतु सर्वांची नाळ कायमच पलूस कॅलनीशी जोडलेली राहिली. कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब गोडबोले यांचे ६ फेब्रुवारी २०१८ रोजी निधन झाले. गोडबोले यांना आदरांजली वाहण्याच्या निमित्ताने तसेच पलूस कॉलनीला ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमासाठी गणेश मंदिरानजीक मंडप उभारण्यात आला होता. अगदी कमी वेळात, पण कल्पनाशक्ती पणाला लावून माहेरवाशिणींनी उत्तम कार्यक्रम सादर केले. स्त्रीजीवनाच्या विविध टप्प्यांवर आधारित अशी गीते एका सूत्रात गुंफून काव्यरुपी कथाही सादर केली. सर्व स्त्रियांनी हादगाही घातला. लगोरी, क्रिकेट, डॉजबॉल अशा मैदानी खेळांनी पटांगणही गाजवले.
रात्री विविध गुणदर्शन कार्यक्रमात गाणी, अभंग, भारुड तर झालेच, पण मंगळागौरीच्या खेळांमधले कौशल्यही सर्व प्रेक्षकांना दाखवले. बाळासाहेब गोडबोले यांना ‘स्वर श्रध्दांजली’ म्हणून सांगीतिक मैफल सादर करण्यात आली.
वृक्षारोपणातून आठवण
वय वर्षे ४ ते ८० पर्यंतच्या हौशी कलाकारांनी गायन, वादन, नृत्य, भारूड, कवन, नाट्य अशा विविध कलांचे सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. आकाशदिवे आसमंतात सोडून कार्यक्रमाची सांगता झाली. दुसऱ्यादिवशी या सोहळ्याची आठवण म्हणून ज्येष्ठ नागरीक रंगनाथ पेहेकर यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.