तासगावात भुयारी गटारीचा काँग्रेसकडून पंचनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:28 AM2021-04-22T04:28:24+5:302021-04-22T04:28:24+5:30
तासगाव : येथील पागा गल्लीत नगरपालिकेच्या वतीने भुयारी गटार योजना अंतर्गत करण्यात आलेल्या चेंबरचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे काँग्रेसने ...
तासगाव : येथील पागा गल्लीत नगरपालिकेच्या वतीने भुयारी गटार योजना अंतर्गत करण्यात आलेल्या चेंबरचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे काँग्रेसने उघड केले. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित ठिकाणांची पाहणी केल्यानंतर हे चेंबर पूर्णपणे चिरल्याचे दिसून आले. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याचा पंचनामा करीत जेसीबीच्या साहाय्याने चेंबर तोडून टाकले.
अपवाद वगळता नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा विरोध सत्ताधारी गटाला होताना दिसत नाही. शहरातील सुरू असलेल्या कामांच्या दर्जाबाबत ठेकेदार कोणतीही काळजी घेताना दिसत नाहीत. हितसंबंध अडकलेले सत्ताधारी नगरसेवक ठेकेदाराला पाठीशी घालतात. तेरी भी चूप मेरी भी चूप, अशी सर्व अवस्था आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने तासगाव शहरासाठी भुयारी गटार योजना मंजूर करण्यात आली आहे. दाेन टप्प्यांमध्ये या याेजनेसाठी जवळपास शंभर कोटींचा निधी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात या कामासाठी शासनाने पैसा उपलब्ध करून देऊनही तत्कालीन पदाधिकारी, कारभारी यांच्यामुळे योजनेचे काम रखडले होते. जाफर मुजावर पक्षप्रतोद झाल्यापासून भुयारी गटारीच्या कामाने चांगली गती घेतली.
निम्म्या शहराचे ड्रेनेजचे पाणी गोळा होऊन पागा गल्लीतून ओढ्याकडे जाते. त्या ठिकाणी चेंबरचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांच्याकडे केली. पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. चेंबर व पाइपलाइनचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्याकडे तक्रार केली. पाटील यांनी नगरपालिका कर्मचारी प्रताप घाडगे व संबंधित कामाचे निरीक्षक सूरज जाधव, प्रमोद नलगे यांना त्याठिकाणी पाठवले. संबंधित चेंबरचा पंचनामा करण्यात आला. यावेळी चेंबर आतून चिरले असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर सिमेंटचे प्रमाण व अन्य बाबीही नियमाप्रमाणे नसल्याचे लक्षात आले. यावेळी हे चेंबर पाडण्याची आक्रमक भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर स्थानिक नागरिकांनी घेतली. त्यामुळे हे चेंबर जेसीबीने उद्ध्वस्त करण्यात आले.
भुयारी गटारच्या तासगाव शहरातील सगळ्या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी यावेळी केली. यावेळी शरद शेळके, रवींद्र साळुंखे, डॉ. विवेक गुरव, राहुल कांबळे, राम जमादार, रितेश रणखांबे, सागर गायकवाड उपस्थित होते.
कोट्स :
तासगाव नगरपालिका ठेकेदारांचा अड्डा बनली आहे. ठेकेदारांच्या सोयीसाठी कामे सुरू आहेत. बहुतांश नगरसेवक ठेकेदार आहेत किंवा अन्य ठेकेदाराकडून कामे करून नगरसेवकांना पैसे दिले जात आहेत. त्यामुळे कामाचा दर्जा राहिलेला नाही. भुयारी गटार योजनेचा आम्ही केलेला पंचनामा एक हिमनगाचे टोक आहे. सगळेच काम बोगस सुरू आहे. या कामाची राज्य सरकारकडून विशेष चौकशी लावावी, अशी मागणी आम्ही शासनाकडे करीत आहोत.
- महादेव पाटील
अध्यक्ष, तासगाव तालुका काँग्रेस